लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यू संख्येने एकाहत्तरी गाठली असून, बाधितांच्या एकूण संख्येनेही आज तेराशेचा टप्पा ओलांडला आहे. चार जणांचा मृत्यू, तर तब्बल ६५ नवीन रुग्णांची नोंद बुधवारी झाली. आतापर्यंत एकूण ७१ जणांचा मृत्यू झाला, तर एकूण रुग्ण संख्या १३०९ वर पोहचली. अकोला जिल्हा कारागृहातही करोनाने शिरकाव केला आहे. १८ कैद्याांना करोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले.
जिल्ह्यातील एकूण ३१० तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २४५ अहवाल नकारात्मक, तर ६५ अहवाल सकारात्मक आले आहेत.

त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १३०९ झाली. सध्या ३३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल (दि.२३) रात्री तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. त्यात सोनटक्के प्लॉट येथील ७० वर्षीय पुरुष असून ते १२ जून रोजी दाखल झाले होते. डाबकी रोड येथील ४८ वर्षीय पुरुष रुग्ण असून त्यांना ९ जून रोजी दाखल करण्यात आले होते. कामा प्लॉट येथील ८० वर्षीय महिला रुग्ण २१ रोजी दाखल झाली होती. या तिन्ही रुग्णांचा काल रात्री सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज दुपारी बाळापूर येथील ४३ वर्षीय पुरुष रुग्णही दगावला. त्यांना ९ जून रोजी दाखल करण्यात आले होते.

आज सकाळच्या अहवालात ५४ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले. त्यात १८ पुरुष रुग्ण हे जिल्हा कारागृहातील कैदी आहेत. अकोला जिल्हा कारागृहातही करोनाचा शिरकाव झाल्याने समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे. कमी लक्षणे असलेल्या त्या रुग्णांवर वेगळी व्यवस्था करून उपचार करण्यात येत आहेत. उर्वरित ३६ जणांमध्ये १४ महिला, तर २२ पुरुष आहेत. त्यात एका तीन महिन्याच्या बालकाचाही समावेश आहे.

यामध्ये तारफैल, न्यू तारफैल येथील प्रत्येकी सात जण, दगडीपूल येथील चार जण, खदान, बाळापूर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित बार्शीटाकळी, कामा प्लॉट, सिंधी कॅम्प, रामदास पेठ, सिव्हिल लाईन, शिवर, जीएमसी वसतिगृह, कळंबेश्वार, जळगाव जामोद, लहान उमरी, कान्हेरी गवळी, सिद्धार्थ नगर, आदर्श कॉलनी, परदेशीपूरा येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. आज सायंकाळी प्राप्त अहवालात आणखी ११ रुग्णांची भर पडली. त्यात सहा महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. ते खदान, शौकतअली चौक, आदर्श कॉलनी, आळशी प्लॉट, देशमुख फैल, लकडगंज, जुना तारफैल, बोरगाव मंजू, शंकरनगर, बार्शीटाकळी आणि वाशीम येथील रहिवासी आहेत.

नऊशेच्यावर रुग्णांची करोनावर मात
जिल्ह्यातील एकूण ९०५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आज सकाळी सहा, तर दुपारनंतर शासकीय वैद्याकीय महाविद्याालयातून २८ जणांना सुट्टी देण्यात आली. कोविड केअर सेंटरमधूनही ४५ जणांना घरी सोडण्यात आले आहे.
१९ दिवसांत ३७ मृत्यू
जिल्ह्यात करोनाच्या उद्रेकाने अद्याापही थांबण्याचे नाव घेतले नाही. रुग्ण संख्येसोबतच मृत्यूचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. पुन्हा एकदा मृत्यूचे सत्र सुरू झाले असून २२ जूनचा अपवाद वगळता गेल्या १९ दिवसांत ३७ करोनाबाधित रुग्णांचा बळी गेला आहे.