News Flash

राज्यात ७१ हजार मुले निवाऱ्याविना

या पाहणीसाठी राज्यातील मुंबई, पुणे आणि नाशिक ही तीन शहरे निवडण्यात आली होती

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : शाळाबाह्य़ मुलांची संख्या घटली, बालकामगार नाहीत, असे शासनाचे दावे खोटे असल्याचे खासगी संस्थेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. राज्यातील हजारो मुलांचे आयुष्य असुरक्षित असून मुंबई, पुणे, नाशिक या तीन शहरांमध्ये रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची संख्या तब्बल ७१ हजार असल्याचे या सर्वेक्षणातून दिसत आहे. त्यातील जवळपास २३ हजार मुले ही शारीरिक, मानसिक शोषणाला बळी पडत असल्याचे खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

‘सेव्ह द चिल्ड्रन’ या मुलांसाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय खासगी संस्थेने ‘न्यू व्हिजन’, ‘सलाम बालक ट्रस्ट’ आणि ‘हमारा फाउंडेशन’ या संस्थांबरोबर महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची पाहणी केली होती. त्यानुसार देशात १२ ते १८ वर्षे या वयोगटातील जवळपास २० लाख मुले रस्त्यावर राहात असल्याचे आढळले आहे.

रस्त्यावर राहणाऱ्या प्रत्येक तीन मुलांतील एक मूल म्हणजे जवळपास २३ हजार मुले शारीरिक, मानसिक शोषणाला बळी पडतात. शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य़ मुलांची संख्या कमी झाल्याचे सांगण्यात येत असतानाच या अहवालानुसार जवळपास ४४ हजार ७०० मुलांना लिहिता-वाचताही येत नाही. प्रत्येक चार मुलांमधील एका मुलाला आठवडय़ातून एकदा उपाशी झोपावे लागते. बहुतांशी मुले पदपथावरच राहतात.  रस्त्यावर राहणाऱ्या मुलांतील ७० टक्के बालकामगार आहेत. या सर्वेक्षणानुसार जवळपास ४९ हजार ७०० बालकामगार असल्याचे दिसत आहे.

५२ हजार ५३६ मुले मुंबईतील

या पाहणीसाठी राज्यातील मुंबई, पुणे आणि नाशिक ही तीन शहरे निवडण्यात आली होती. त्यानुसार गेल्या वर्षी (२०१८) या तीन शहरांमध्ये मिळून ७१ हजार ५८ मुलांना निवाराच नसल्याचे समोर आले आहे. यातील सर्वाधिक म्हणजे ५२ हजार ५३६ मुले मुंबईतील आहेत. पुण्यात १४ हजार ६२७ मुले आणि नाशिक येथे ३ हजार ८९५ मुले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 3:51 am

Web Title: 71 thousand children living without shelter in maharashtra
Next Stories
1 अल्पवयीन मुलीची छेड काढणे महागात पडले
2 स्वाइन फ्लूचा मुक्काम कायम ; राज्यात तीन महिन्यांत ९४ रुग्ण दगावले
3 ‘सीबीएसई’च्या शाळांमध्ये कला शिक्षण बंधनकारक
Just Now!
X