|| नीरज राऊत

४४ मृत्यू; २१ ते ४० वयोगटातील बाधित अधिक

पालघर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मार्च व एप्रिल महिन्यात ७१५९ नागरिकांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजाराने बाधित होणारे अधिकतर नागरिक २१ ते ४० वयोगटातील असून मृत्यू झालेले रुग्ण ४० ते ८० वयोगटातील असल्याची माहिती पुढे आली आहे.

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र वगळता उर्वरित जिल्ह्यात मार्च महिन्यात १६७८ व एप्रिल महिन्यात ५४८१ नागरिकांना करोनाबाधा झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. संसर्ग होण्याचा दर मार्च महिन्यात ११ टक्के इतका होता, मात्र एप्रिल महिन्यात संसर्ग होण्याची टक्केवारी ३२ वर पोहोचली आहे. संसर्ग होणाऱ्या भागांमध्ये पालघर, जव्हार व मोखाडा या तालुक्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

या दीड महिन्याच्या कालावधीत एकूण ४४ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ३६ मृत्यू एप्रिल महिन्याच्या पंधरवड्यात झाले आहेत. जिल्ह्याच्या या काळातील मृत्युदर एकपेक्षा कमी असला तरी जव्हार येथे एप्रिल महिन्यात अकरा रुग्ण दगावले असून पालघर तालुक्यातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. करोनाबाधित होणारे नागरिक अधिक तर तरुण वयोगटातील असले तरी मृत होणारे रुग्ण हे ४० वर्षांवरील वयोगटातील असल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे.

पालघरमध्ये रुग्णांचा उच्चांक

पालघर तालुक्यात गेल्या २४ तासांत ४०६ नवीन रुग्ण आढळले असून हा गेल्या वर्षभरात वर्षभरातील उच्चांक ठरला आहे. गुरुवारी पालघरमध्ये ३०१ नवीन रुग्ण आढळले होते. सध्या पालघर मध्ये २१८० उपचाराधीन रुग्ण असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उपचाराधीन रुग्णांची संख्या ४४३२ वर पोहोचली आहे. ग्रामीण जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ९२० नवीन रुग्ण वाढले असून सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शाळा अंगणवाड्यांमध्ये काळजी केंद्र

ग्रामीण भागातील नागरिक करोना काळजी केंद्रामध्ये भरती होण्यास पुढे येत नसल्याने सर्व तालुक्यातील ग्रामीण भागामधील अशा बाधित रुग्णांची जवळच्या प्राथमिक शाळेत राहण्याची व्यवस्था करावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिल्या आहेत. अशा बाधित रुग्णांना त्यांच्या घरून जेवणाची व्यवस्था आणण्याची मुभा देण्यात आली असून यामुळे अशा विलगीकरण पद्धतीमुळे आजाराचा झपाट्याने होणाऱ्या प्रसारावर नियंत्रण येण्यास मदत होईल असे जिल्हा प्रशासनाला वाटत आहे.

प्रतिजन चचणीवर भर

डहाणू येथील शासकीय प्रयोगशाळेत १०० आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात असून याच तालुक्यातील वेदांता रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ५० चाचण्या करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आरटीपीसीआर तपासणीच्या मर्यादा लक्षात घेऊन तसेच हा चाचणी अहवाल उपलब्ध होण्यास चार ते पाच दिवसांचा अवधी लागत असल्याने अधिकाधिक प्रमाणात प्रतिजन तपासणी करण्यावर भर द्यावा अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.