लोकसत्ता प्रतिनिधी
विदर्भातील सर्वाधिक रुग्ण व मृत्यू संख्या असलेल्या अकोल्यात करोनाचा उद्रेक सुरूच आहे. शहर व जिल्ह्याच्या विविध भागातील तब्बल ७२ नवीन रुग्णांचा करोना तपासणी अहवाल बुधवारी सकारात्मक आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ५०७ वर पोहोचली. रुग्ण संख्येत पाचशेचा टप्पा ओलांडणारा अकोला हा विदर्भातील पहिला जिल्हा ठरला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २८ जणांचे बळी गेले. सध्या १६४ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अकोला शहरासह जिल्ह्यात करोना रुग्ण संख्येत अत्यंत वेगाने वाढ होत आहे. बुधवारी दिवसभरात आणखी तब्बल ७२ रुग्णांची नोंद झाली. एकाच दिवसातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी रुग्ण संख्या ठरली. या अगोदर ८ मे रोजी एका दिवसांत ४२ रुग्ण आढळले होते. जिल्ह्यातील एकूण ३०८ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २३६ अहवाल नकारात्मक, तर ७२ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. आतापर्यंत ३१५ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यापैकी २६ जणांना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यातील पाच जण घरी, तर २१ जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. अकोला मनपाच्या एका आरोग्य निरीक्षकालाही बाधा झाली आहे.

आज सकाळच्या अहवालानुसार ३० रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले. त्यात १० महिला व २० पुरुषांचा समावेश आहे. यात सर्वाधिक १३ जण हरिहर पेठ भागातील आहेत. मोहता मिल प्लॉट नाजूक नगर, मोठी उमरी, गुलजारपूरा येथील प्रत्येकी दोन जण, तर खैर मोहम्मद प्लॉट, राहुल नगर शिवनी, तेलीपूरा, लेबर कॉलनी तारफैल, सहकार नगर, डाबकी रोड, वृंदावन नगर, देशमुख फैल, चाँदखा प्लॉट वाशीम बायपास, फिरदोस कॉलनी व रणपिसे नगर येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळच्या अहवालानुसार आणखी तब्बल ४२ रुग्णांची वाढ झाल्याने आज दिवसभरात एकूण ७२ रुग्ण आढळून आले.

संध्याकाळी सकारात्मक आढळून आलेल्या रुग्णांमध्ये १९ महिला व २३ पुरुष आहेत. त्यात अकोट फैल येथील ११, रामदास पेठ, माळीपूरा येथील प्रत्येकी पाच, मूर्तिजापूर तीन, फिरदोस कॉलनी, अशोक नगर, डाबकी रोड येथील प्रत्येकी दोन, तर महसूल कॉलनी, रजतपूरा, गायत्रीनगर, सिंधी कॅम्प, गर्ल्स होस्टेल आरटीएएम, शिवसेना वसाहत, देशमुख फैल, संताजी नगर, जठारपेठ, न्यू तारफैल, गुलिस्तान कॉलनी व मोमीनपूरा येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. मृत्यू व रुग्णवाढीच्या मोठ्या संख्येमुळे अकोल्यात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.

शहरात आजपासून प्रत्येकाची तपासणी
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महानगरपालिका हद्दीत प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्याची आरोग्य तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली. ही मोहीम २८ मे ते ३ जून या कालावधीत अकोला महानगरपालिका हद्दीत राबविली जाईल, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत. भविष्यात पावसाळ्याचा कालावधी लक्षात घेता आजारांचा अधिक फैलाव होण्याआधी ही तपासणी पूर्ण करणे आवश्यक आहे.