कुडाळ नगर पंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक आज झाली. या निवडणुकीत उमेदवारापेक्षा माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते नारायण राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीचा प्रचारदेखील विधानसभा निवडणूक धर्तीवरच झाला आहे. उद्या १८ एप्रिलला कोणी कोणाला धूळ चारली हे उघड होणार आहे. सत्ताधारी शिवसेना-भाजपने या ठिकाणी स्वबळ दाखविले आहे. त्याचा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला कितपत फायदा होतो आहे, हेही पुढील जिल्हा परिषद व नगर पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकांची नांदी ठरेल. त्यातूनच राजकीय पक्षांना धडाही घेता येईल, असे बोलले जात आहे. माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते नारायण राणे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. त्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी पराभूत केले. कुडाळ शहर हे राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचे शहर मानले जाते. त्यामुळे आजी-माजी आमदारांनी नव्याने स्थापन झालेल्या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या नगर पंचायतीच्या १७ जागांसाठी ७७ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना-भाजप स्वबळावर तर काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. मनसेने मोजक्या जागेवर उमेदवार उभे केले आहेत. या निवडणुकीत १२ हजार ६७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. संध्याकाळी साडेतीन वाजेपर्यंत ६४ टक्के मतदान झाले होते. शिवसेना-भाजपच्या स्वबळाच्या खुमखुमीचा निकाल उद्याच स्पष्ट होईल तर नारायण राणे यांच्या पुन्हा सक्रिय झाल्यानंतरच्या करिश्म्यालादेखील उत्तर मिळणार आहे. या नगर पंचायत निवडणुकीत शहराच्या विकासापेक्षा देश व राज्यस्तरीय विकासाची किंवा सरकारच्या नाकर्तेपणाची चर्चा झाली. कुडाळ नगर पंचायतीसाठी ७३.६३ टक्के मतदान झाले. शांततेत मतदान झाले. कुडाळात निवडणूक यंत्रणेने आचारसंहितेचे काटेकोर पालन केले.