नेवासे तालुक्यातील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी गुरुवारी शांततेत ७४.४८ टक्के मतदान झाले. मतमोजणी परवा (शनिवार) नेवासे येथे होणार आहे.
कारखान्याच्या संचालक मंडळातील २१ जागांसाठी निवडणूक होत आहे. यातील आठ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १३ जागांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले. या १३ जगांसाठी २१ उमेदवार रिंगणात आहेत. सुमारे १५ हजारपैकी ११ हजार २२२ सभासदांनी उत्साहात मतदान केले. अनेक केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
कारखान्याचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले व माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी मंडळ व विरोधी स्वतंत्र उमेदवार रिंगणात आहेत. चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले, उपाध्यक्ष देसाई-देशमुख यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे, अनिल हापसे, आशा भोसले, लताबाई मिसाळ यांचा बिनविरोध झालेल्यांमध्ये समावेश आहे.
भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी या कारखान्याच्या निवडणुकीतून अनपेक्षितरीत्या माघार घेऊन सत्ताधारी घुले गटाला जाहीर पाठिंबा दिला. विरोधकांना केवळ आठच जागांवर उमेदवार उभे करता आले.
‘वृद्धेश्वर’ची आज निवडणूक
पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उद्या (शुक्रवार) मतदान होणार आहे. संचालकांच्या १९ पैकी १४ जागांवरील निवडी बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ५ जागांसाठी मतदान होणार आहे.