चिपळूण : शहरातील काविळतळी येथील एका महिलेला कुंभार्ली येथील एका कुटुंबाने व्यवसायाचे आमिष दाखवून तिच्याकडून तब्बल ७५ तोळे सोन्याचे दागिने हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात चारजणांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून १० तोळे सोने हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिस ठाण्यातून देण्यात आली.

लुबना राहिल अत्तार (रा.काविळतळी, चिपळूण) यांनी या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून रजिया कुंभार्लीकर, तरबेज कुंभार्लीकर, तन्वीर कुंभार्लीकर आणि अलीसाहब कुंभार्लीकर (सर्व राहणार कुंभार्ली) या चौघांविरुद्ध फसवणूक आणि लुबाडणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुबना अत्तार या शहरातील काविळतळी येथे राहत असून त्यांचे पती नोकरीनिमित्त परदेशात असतात. कुंभार्ली येथील रजिया, तरबेज, तन्वीर व अलीसाहब कुंभार्लीकर हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. कुंभार्ली येथे आपल्या मालकीची जमीन असून त्यावर उद्योग व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहाय्याची  मागणी या कुटुंबाने लुबना यांच्याकडे केली होती. त्यासाठी कुंभार्लीकर कुटुंबाने लुबना हिला विविध आमिषे दाखवून तसेच गोड बोलून वेळोवेळी सोन्याचे दागिने घेतले.ही घटना २०१८ मध्ये घडली होती

. दोन वर्षे झाली तरी कुंभार्लीकर कुटुंबाने लुबना यांना दागिने परत केले नाहीत. त्यांच्याकडे दागिन्यांची वारंवार मागणी करूनही चालढकल केली जात असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लुबना यांच्या लक्षात आले. अखेर गेल्या २६ सप्टेंबर रोजी त्यांनी चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दिली. त्यानुसार या प्रकरणाचा तपास करून पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत झगडे यांनी संशयित आरोपी अलीसाहब कुंभार्लीकर याला अटक केली आणि त्याच्याकडून ७५ तोळे सोन्यापैकी १० तोळे सोने हस्तगत केले. उर्वरित तीन संशयित आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.