चंद्रपूर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरगच्च

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात डेंग्यू, मलेरिया, टायफाईड, चिकन गुनिया व साथीच्या आजाराच्या रुग्णांची गर्दी झालेली आहे. ४५० खाटांच्या रुग्णालयात आज ७५५ रुग्ण भरती आहेत. एका खाटेवर साधारणत: दोन रुग्ण आहेत. बहुतांश वार्डात तर खाली जमिनीवर गादी टाकून रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

या जिल्हय़ात गेल्या महिनाभरापासून साथीच्या आजाराने थमान घातले आहे. डेंग्यूसारख्या आजाराने तरुण अभियंता निखिल बावीसकर व अन्य एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे, तर ९०च्या वर डेंग्यूचे रुग्णांची नोंद घेण्यात आलेली आहे. अशाही स्थितीत सर्वकाही आलबेल आहे, असेच दाखवण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून होत आहे. मात्र, परिस्थिती अतिशय वाईट आहे. डासांमुळे डेंग्यूच्या रुग्णात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा परिणाम जिल्हा रुग्णालयासोबतच खासगी रुग्णालयामध्येही रुग्णांची संख्या वाढली आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने जिल्हा रुग्णालयाला भेट दिली असता ४५० खाटांच्या रुग्णालयामध्ये ७५५ रुग्ण उपचारासाठी भरती झाले आहेत. विशेष म्हणजे दहा दिवसांपूर्वी यापेक्षा कितीतरी जास्त हा आकडा होता, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस. मोरे यांनी दिली. केवळ डेंग्यू नाही तर मलेरिया, टायफाईड, चिकन गुनिया तथा साथीच्या आजाराचे असंख्य रुग्ण दररोज रुग्णालयामध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे एका खाटेवर दोन रुग्ण किंवा खाली जमिनीवर गादी टाकूनही रुग्णांना ठेवण्यात आले आहे. २५ खाटाच्या एका वार्डात तर ७० ते ८० रुग्णांना झोपवण्यात आले आहे. यावरून परिस्थिती किती गंभीर आहे, हे दिसून येते. साथीच्या रोगाचे थमान बघता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारीच जिल्हाधिकाऱ्यांना याकडे बारकाईने लक्ष देऊन प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने आढावा बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, अजूनही परिस्थितीत कुठलीही सुधारणा झालेली नाही. धूळ व प्रदूषणामुळे तर हा आजार आणखीच बळावला असून अनेकांना घसा, कोरडा खोकला आदी आजाराची लागण झालेली आहे.

वैद्यकीय महाविद्यालयात रुग्ण उपचार घेत असले तरी औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांना औषधांची खरेदी बाहेरून करावी लागत आहे.

चंद्रपूर जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन पुरवठा पुरेसा आहे. त्यामुळे मागील महिन्यात १८ ऑगस्टला मनोहर नांदेकर यांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाला नाही, असा दावा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस. मोरे यांनी केला आहे.