जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, उपविभागीय कृषी अधिकारी संपतराव थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यात १५ डिसेंबपर्यंत एकूण ७६ कच्चे वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती खालापूर तालुका कृषी अधिकारी देवेंद्रनाथ ढगे यांनी दिली.
कृषी विभागाकडून महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत उपक्रमानुसार ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ याचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.
 या उपक्रमाचा एक भाग म्हणून खालापूर तालुक्यातील १३ गावांमध्ये एकूण २० कच्चे वनराई बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. प्रगतिपथावर असलेले हे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण होणार आहे. त्यामध्ये चावणी (२), भिलवले (२), नडोदे (२), वडगाव (२), नढाळ (२), रिस (२), गोठिवली (२), गोरठण-खुर्द (२), आपटी (१), तळाशी (१), शिरवली (१), चिंचवली-गोहे (५), आडोशी (१) या गावांचा समावेश आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील २४ गावांमध्ये एकूण ५६ कच्चे वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्यामध्ये नढाळ (३), वडगाव (३), तळोली(३), नडोदे (६), जांबरुंग (४), सोंडेवाडी (१), तळेगाव (२), लोधिवली (२), पानशीळ (५), चांभार्ली (२), बोरगाव (४), वडवळ (५), आपटी (३), नंदनपाडा (५), होराळे (३),परखंदे (२ कारगाव (१), दूरशेत (२), चावणी (२), गोठिवली (२), खरिवली (२), चिलठण (१), आत्करगाव (३), आडोशी (२) या गावांचा समावेश आहे. खालापूर तालुक्याचे तहसीलदार दीपक आकडे यांनी या २४ गावांच्या प्रस्तावास मंजुरी दिलेली आहे.
 या २४ गावांतील ५६ कच्चे वनराई बंधाऱ्याचे बांधकाम १५ डिसेंबपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. खासगी मालमत्ता असलेल्या शेतजमिनीतून पावसाचे पाणी नालेस्वरूपात वाहत जाताना आढळून येत आहे. अशा किमान ५ मीटर ते कमाल १५ मीटर रुंदीचे पात्र असलेल्या नाल्यावर हे कच्चे वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. या कच्च्या वनराई बंधाऱ्यामुळे अडविण्यात येणाऱ्या पाण्याचा विनियोग मार्च-एप्रिलपर्यंत होऊ शकतो. पर्यायाने पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होते. गुरा-ढोरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होते. भूगर्भातील पाण्याचा साठा वृद्धिंगत होतो. बोअरवेलना विनाखंड पाण्याचा साठा उपलब्ध होतो. शेतकरीबांधवांना भातपिकानंतर भाजीपाला पीक घेण्यासाठी पाणीसाठा उपलब्ध होतो.
तो दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून किमान खर्चात व प्रसंगी श्रमदानातून हे कच्चे वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. मंडळ अधिकारी आर. आर. जाधव व अन्य अधिकारी व कर्मचारी संकल्पपूर्तीसाठी झटत आहेत, असा निर्वाळा शेवटी ढगे यांनी दिला.