डॉक्टर, नर्स, सफाई कामगारानंतर आता पोलिसांनाही करोनानं ग्रासलं आहे. राज्यात आतापर्यंत ७८६ पोलिसांना करोनानं ग्रासलं आहे. तर सात जणांचा करोनानं बळी घेतला आहे. ७६ पोलिसांनी करोनावर मात केल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. मागील २४ तासांत राज्यात तब्बल दीडशे पोलिसांना करोनानं ग्रासलं आहे. मुंबईत करोनाबाधित पोलिसांची संख्या अडीचशेच्या घरात आहे. शेकडो पोलिसांमध्ये करोनासदृश लक्षणे दिसत असून, राज्यभरात सुमारे तीन हजार पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले आहे. पोलिस करोनाबाधित होत असल्याचा फटका त्यांच्या कुटुंबीयांनाही बसत आहे. संपर्कात आल्याने पोलिस कुटुंबीयांचेही विलगीकरण करावे लागत आहे.

करोनाची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे पोलिस दलात अस्सवस्थ वातावरण निर्णाण झालं आहे. मुंबईत चार पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे तर नवी मुंबई, सोलापूर आणि पुणे येथे प्रत्येकी एका पोलिसाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईसह राज्यात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना मोठ्या प्रमाणात करोनाची लागण होत असल्याने पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

महाराष्ट्रात करोनाचे संकट दिवसागणिक आधिकच गडद होत आहे. करोनावर मात करण्यासाठी हॉटस्पटच्या ठिकाणी लॉकडाउन आणखी कडक करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. मात्र, नागरिकांमध्ये करोनाचं गांभीर्य दिसून येत नाही. लोक विनाकाराण घराच्या बाहेर पडत आहे. बाजारात गर्दी करत आहे. सुरक्षित वावरचा विसर असे प्रकार सर्वच ठिकाणी घडत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे काम मात्र पोलिसांना करावे लागत आहे. नियम मोडणाऱ्यांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, कागदपत्रे बनविणे अशी कामे करताना पोलिसांचा त्यांच्याशी थेट संपर्क येतो. यामुळे पोलिसांना करोनाची लागण झपाट्याने होत आहे.