महाराष्ट्रात ७९० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या १२ हजार २९६ झाली आहे. तर मागील चोवीस तासात ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ५२१ रुग्णांचा मृत्यू करोनाची लागण झाल्याने झाला आहे. आज महाराष्ट्रात १२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रातील २ हजार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आज राज्यात ३६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी २७ मृत्यू मुंबईत, ३ पुण्यात, २ अमरावतीत, वसई-विरारमध्ये १, अमरावती जिल्ह्यात १, तर औरंगाबाद मनपातील १ मृत्यू आहे. या शिवाय प. बंगालमध्या एकाचा मृत्यू मुंबईत झाला आहे.

आज झालेल्या ३६ मृत्यूंपैकी २८ पुरुष तर ८ महिला आहेत. ३६ पैकी १९ रुग्ण हे ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे आहेत. तर १६ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील तर एक जण ४० वर्षांखालील आहे. यापैकी तिघांची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. सध्या राज्यात १ लाख ७४ हजार ९३३ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर १२ हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

देशभरात खबरदारीचे सगळे उपाय योजले जात आहेत. लॉकडाउन १७ मेपर्यंत वाढवण्यात आला असला तरीही ग्रीन झोनमध्ये काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. तसंच सोशल डिस्टन्सिंग पाळा असं आवाहनही करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने कालच करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाउन वाढवण्यात आल्याची घोषणा केली. आणखी दोन आठवडे म्हणजेच १७ मेपर्यंत देशभरात लॉकडाउन कायम असणार आहे. त्यानंतर काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जे राज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरित मजूर आहेत त्यांना त्यांच्या गावी जाता यावं म्हणून बस सेवा सुरु करण्यात आली आहे. काही विशेष ट्रेनही सोडण्यात आल्या.