एक खळबळजनक माहिती नांदेडमधून समोर येत आहे. एका धार्मिक कार्यक्रमासाठी पंजाबमधून आलेले शीख यात्रेकरू लॉकडाउनमुळे नांदेडमध्येच अडकून पडले होते. या यात्रेकरूंना आठ दहा दिवसांपूर्वी विशेष गाड्यांनी परत स्वगृही पाठवण्यात आलं. पण, नांदेडमधून पंजाबमध्ये गेलेल्या यात्रेकरुंपैकी तब्बल ७९५ जण करोनाग्रस्त निघाले आहेत. त्यामुळे पंजाब सरकारची झोप उडाली असून, नांदेड प्रशासनही हादरलं आहे. कारण हे यात्रेकरू महिनाभर नांदेडमध्ये मुक्काम करून होते.
हल्ला महल्लासाठी पंजाबमधून काही भाविक नांदेडमध्ये आले होते. त्यानंतर लॉकडाउन लागू झाल्यानंतर ४० दिवसापासून हे भाविक मुक्कामाला होते. त्यांना परत नेण्यासाठी पंजाब सरकारकडून प्रयत्न सुरू होते. महाराष्ट्र सरकार आणि पंजाब सरकारमध्ये झालेल्या चर्चेनंतर केंद्रानं त्यास परवानगी दिली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ट्रॅव्हल्सनं तेरा गाड्यामधून १७०० जणांना घरी सोडण्यात आलं. त्यानंतर टप्याटप्यानं इतरही यात्रेकरूंना पंजाब सरकार परत घेऊन गेलं. पण, या यात्रेकरूंची घेऊन जाण्याआधीच करोना चाचणी न केल्यानं आता ही धक्कादायक आकडेवारी समोर येऊ लागली आहे.
पंजाब सरकारनं ८० ट्रॅव्हल्सच्या मदतीनं ४ हजार नागरिकांना परत राज्यात नेले. त्याठिकाणी या यात्रेकरूंची तपासणी करण्यात आली. त्यात तब्बल ७९५ जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत. २८ एप्रिल रोजी पंजाबमधील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५१० पर्यंत होती. मात्र, अचानक आठशे रुग्ण वाढल्यानं पंजाबमधील रुग्णांची १२३२ वर पोहोचली आहे.
आणखी वाचा- Coronavirus : औरंगाबादेत 28 नवे रुग्ण, एकूण संख्या 349 वर
नांदेडमधील २० सेवक, ६ चालकही करोनाग्रस्त
पंजाबमधील सुरूवातीची आकडेवारी समोर आल्यानंतर नांदेड जिल्हा प्रशासनानं तातडीनं तपासणी करण्याचं काम हाती घेतलं. या यात्रेकरूंच्या सेवेत असलेल्या सेवेकऱ्यांची चाचणी करण्यात आली. यात २० जणांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर यात्रेकरूंना सोडण्यासाठी गेलेल्या ६ चालकांनाही करोनाची लागण झाली आहे. या सगळ्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं असून, उपचार करण्यात येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 6, 2020 3:53 pm