मालवणमधील दुर्घटना; बेळगाववर शोककळा; मृतांमध्ये प्राध्यापकासह तीन विद्यार्थिनींचा समावेश

समुद्रस्नानासाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी मालवण किनाऱ्यावर घडली. मृतांमध्ये एका प्राध्यापकाचा समावेश आहे. सर्वजण बेळगाव येथील मराठा मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. दरम्यान, तीन विद्यार्थ्यांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. गेल्या वर्षी फेब्रुवारीत मुरुड येथील समुद्रात १३ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता.

बेळगावातील मराठा मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक शाखेच्या ४७ विद्यार्थ्यांची औद्योगिक सहल निघाली होती. १२ एप्रिलपासून निघालेली ही सहल बेळगावी परतत असताना शनिवारी मालवण येथे पोहोचली. मालवणनजीक असलेल्या वायरी भूतनाथ येथे समुद्रकिनाऱ्यावर सर्व विद्यार्थी व दोन प्राध्यापक समुद्रस्नानासाठी आले. स्नानाचा आनंद लुटत असताना प्राध्यापक महेश कुडचकर यांच्यासह ११ विद्यार्थी थोडे अधिक खोलवर गेले. त्याच वेळी आलेल्या एका महाकाय लाटेने या सर्वाना आणखी आत ओढले. घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. किनाऱ्यावर असलेले सुरक्षारक्षक व स्थानिक मच्छीमारांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र बुडणाऱ्यांपैकी तीन विद्यार्थ्यांनाच वाचविण्यात त्यांना यश आले. उर्वरित आठही जण बुडाले. त्यांचे मृतदेह उशिराने हाती लागले. या घटनेच्या साक्षीदार असलेल्या प्राध्यापिका वैदेही देशपांडे यांना प्रचंड मानसिक धक्का बसला असून त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, वाचविण्यात आलेल्या अनिता हानली (बेळगाव), संकेत गाडवी (गडहिंग्लज) आणि आकांक्षा घाटके (बेळगाव) या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेची महिती कळताच पोलीस अधीक्षक अमोघ गांवकर, पोलीस निरीक्षक अरविंद बोडके आणि वैभव नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. सागर जोशी, केदार भगत, सत्यवान भगत, दामोदर भगत, राजा नाईक आणि समीर पारकर यांनी अत्यवस्थ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात सहकार्य केले.

मृतांची नावे..

  • प्रा. महेश कुडचकर (३५, रा. नार्वेकर गल्ली, शहापूर), करुणा बेर्डे (२२, काकती, बेळगाव), मुजम्मील अन्निकेर (२२, आझादनगर, बेळगाव), किरण खांडेकर (२२, तुरमुरी, बेळगाव), अवधूत तहसीलदार (२१, महानवेसनगर, बेळगाव), आरती चव्हाण (२२, गणेशनगर, बेळगाव), माया कोले (२२, बंबारगाव, बेळगाव) आणि नितीन मुत्नाळकर (२२, काकती, बेळगाव)