संस्कृत भाषा बोलणाऱ्यात ७१ टक्के वाढ

नवी दिल्ली : संस्कृत भाषा फारशी वापरली जात नाही असा समज असला तरी २०११ च्या जनगणनेनुसार संस्कृत बोलणाऱ्यांची संख्या दहा वर्षांत दहा हजारांनी वाढली असून ही वाढ ७१ टक्के आहे. देशातील ८.३० कोटी लोक मराठी बोलणारे असून त्यांचे प्रमाण लोकसंख्येच्या देशाच्या ६.८६ टक्के आहे. मराठी बोलणाऱ्यांची संख्या २००१ मध्ये ७.१९ कोटी होती. मराठी बोलणाऱ्यांची संख्या पंधरा टक्के वाढली आहे.

हिंदी बोलणाऱ्या लोकांची संख्या २००१-११ दरम्यान १० कोटींपेक्षा अधिक वाढली असून बंगाली भाषा बोलणाऱ्यांच्या संख्येत १.१० कोटींची वाढ झाली आहे. २०११ च्या जनगणनेचे आकडे नुकतेच जाहीर करण्यात आले असून  २००१ मध्ये १४,१३५ जणांनी संस्कृत ही मातृभाषा असल्याचे सांगितले ते प्रमाण २०११ मध्ये २४,८२१ झाले आहे. भारताच्या १२१ कोटी लोकसंख्येत ०.००१९८ टक्के लोक संस्कृत बोलणारे आहेत. हिंदी बोलणारे ५२.८३ कोटी लोक असून त्यांचे प्रमाण लोकसंख्येच्या ४३.६३ टक्के आहे. २००१ मध्ये हिंदी बोलणाऱ्यांची संख्या ४२.२० कोटी होती. बंगाली भाषा बोलणाऱ्यांची संख्या ९.७२ कोटी असून ते प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ८.०३ टक्के आहे. बंगाली बोलणाऱ्यांची संख्या १० वर्षांपूर्वी ८.३३ कोटी होती.

तेलगु, तामिळ व गुजराती बोलणाऱ्यांची संख्या अनुक्रमे ८.११ कोटी, ६.९० कोटी, ५.५४ कोटी आहे. त्यांची संख्या २००१ मध्ये ७.४० कोटी, ६.०७ कोटी, ४.६० कोटी होती. उर्दू, कन्नड व ओडिया भाषा बोलणाऱ्यांची संख्या अनुक्रमे ५.०७ कोटी, ४.३७ कोटी व ३.७१ कोटी होती. २००१ मध्ये त्यांची संख्या ५.१५ कोटी, ३.७९ कोटी व ३.३० कोटी होती. मल्याळम, पंजाबी, आसामी बोलणाऱ्यांची संख्या २०११ मध्ये ३.४८ कोटी, ३.३१ कोटी व १.५३ कोटी होती तर २००१ मध्ये ती ३.३० कोटी, २.९१ कोटी, १.३१ कोटी होती.