कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीमार्फत पाटण तालुक्यातील विकासकामांसाठी ८ कोटी ७० लाख रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. समितीकडे उपलब्ध निधीपैकी ३५ टक्के निधी पाटण तालुक्याच्या वाटय़ाला येणार असल्याने त्यातून भूकंप प्रवणक्षेत्र असलेल्या कोयनानगरसह पाटण तालुक्यातील भूकंपामुळे बाधित होणा-या प्रकल्प व वास्तूंना नवसंजीवनी देण्याचे काम होणार आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हे धोरण निश्चित करण्यात आले असून, दरवर्षी या समितीला ५ कोटी रुपयांचा निधी देण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हे धोरण अधोरेखित करण्यात आले. पाटण तालुक्यातील शैक्षणिक संस्थांच्या इमारतीचे बांधकाम, भूकंपामुळे नुकसान झालेल्या इमारत खोल्यांची पुनर्बाधणी, पिण्याच्या पाण्याच्या योजना, भूकंपबाधित घरांची पुनर्बाधणी अशी कामे या विशेष निधीतून होणार आहेत.