शहरातील नागरिक आणि पोलीस गणेशोत्सवामध्ये मग्न असल्याचा फायदा उठवत चोरटय़ांनी मध्य वस्तीतील आठ दुकाने एकाच रात्रीत फोडण्याचा प्रकार घडला आहे.
गणेशोत्सवाची धामधूम गेल्या रविवारी संपली. त्यानंतर शहरातील प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा सोमवारी रात्री उशिरापर्यंत पार पडला. त्यामुळे बहुसंख्य नागरिक या सोहळ्यामध्ये दंग होते. तसेच सार्वजनिक व घरगुती विसर्जन कार्यक्रमांमध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून गेले तीन दिवस पोलीस विशेष सतर्क होते. शहरासाठी उपलब्ध मर्यादित मनुष्यबळामुळे दैनंदिन गस्तीच्या मोहिमेवर परिणाम झाला. या संधीचा फायदा उठवत चोरटय़ांनी गोखले नाका परिसरातील सलग आठ दुकाने सोमवारी रात्री फोडली. त्यामध्ये मुकुंद प्लाझा, मुकुंद पान शॉप, उज्ज्वला वॉच, रत्नागिरी गादी कारखाना, अभिजीत सायकल मार्ट, करमरकर दवाखाना, शिवकृपा आणि जागृती ट्रान्स्पोर्टच्या ऑफिसचा समावेश आहे. मात्र इतक्या संख्येने दुकाने फोडूनही दुकानदारांच्या सतर्कतेमुळे चोरटय़ांच्या हाती एकूण जेमतेम अडीच हजार रुपये लागल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. कदाचित त्यामुळेच आणखी रकमेच्या शोधात चोरटय़ांनी एवढय़ा संख्येने दुकाने फोडली असावीत असा पोलिसांचा कयास आहे. हा प्रकार एका टोळीने केला, की कोण्या भुरटय़ा चोराने केला, याबाबत पोलीस निष्कर्षांप्रत आले नसले तरी एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एका चोरटय़ाची छबी टिपली गेली आहे. त्यामुळे या प्रकाराचा लवकरच छडा लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.