राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर नाराज असलेले ८ ते १० आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. राज्यातील काँग्रेस नेतृत्वानेच पक्षाला संपवल्याची आरोपही त्यांनी केला असून सत्तार यांच्या दाव्यानंतर काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे.

उमेदवारी न दिल्याचे कारण देत नाराज असल्याचे जाहीर करणारे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मंगळवारी विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून राजीनामा देण्यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुंबईतील बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीला आमदार अब्दुल सत्तार, आमदार भारत भालके, जयकुमार गोरे, माढाचे खासदार रणजीत निंबाळकर आदी नेते उपस्थित होते.

अब्दुल सत्तार यांनी या बैठकीनंतर ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेसमधील राज्यातील नेतृत्वावर टीका केली. काँग्रेसमधील राज्यातील नेतृत्वावर नाराज असलेले ८ ते १० आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असून उर्वरित आमदार कोण, याची चर्चा आता सुरु झाली आहे.

दरम्यान, राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील काँग्रेसवर टीका केली. माझी काँग्रेसमध्ये कोंडी होत आहे असुन आता माझी इथे घुसमट होत आहे. मला अनेक आमदार भेटत आहेत परंतु, त्यांनी राजीनामा द्यायचा की नाही हा त्यांचा निर्णय आहे. मी मात्र आज एकटा राजीनामा देतोय, असे त्यांनी माध्यमांना सांगितले.

अब्दुल सत्तार यांच्या भाजपाप्रवेशावरुन भाजपामध्येच मतभेद असल्याचे दिसते. सत्तार यांच्या भाजपाप्रवेशास भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवल्याचे वृत्त आहे.