मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पंढरपूर : राज्यातील दुष्काळग्रस्त भागात ठिबक सिंचन योजनेसाठी ८० टक्के अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. तसेच ‘महाअ‍ॅग्रो टेक’ च्या माध्यमातून शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. अशा पद्धतीचा प्रयोग राज्यातील ६ जिल्ह्यात केला जाणार आहे. या पुढे दुष्काळमुक्त आणि शाश्वत शेतीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली.

आषाढी यात्रेच्यानिमित्ताने येथे आयोजित ‘कृषी पंढरी’ कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील घोषणा केली. या वेळी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, माधव भंडारी, राज्यमंत्री डॉ. अतुल भोसले, माजी खा.विजयसिंह मोहिते पाटील, माजी आ. सुधाकर परिचारक, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने विविध योजना राबविल्या आहेत. गेल्या १५ वर्षांत काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजनांवर जेवढा खर्च केला त्यापेक्षा जास्त आमच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत केला आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे दुष्काळाची दाहकता कमी झाली आहे. जलसंधारणाबरोबरच जलसंपदाची कामेदेखील पूर्ण होत आहेत. युतीच्या मागील काळातील रखडलेली टेंभू योजना युतीच्या काळातच आम्ही पूर्ण केली.

आम्ही आता तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी करणार  असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, की ‘महाअ‍ॅग्रो टेक’च्या माध्यमातून ‘पेरणी ते कापणी’पर्यंत सर्व काही डिजिटाईल पद्धतीने होणार आहे. याबाबतचा  प्रयोग राज्यातील ६ जिल्ह्यात सुरु केला आहे. लवकरच सर्व ठिकाणी हा प्रयोग सुरु करू असेही ते म्हणाले. त्याच बरोबर राज्यातील दुष्काळग्रस्त भागात ठिबक सिंचन योजनेसाठी ८० टक्के अनुदान देण्याची घोषणाही या वेळी मुख्यमंत्र्यांनी केली. या वेळी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांचे भाषण झाले. आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रास्ताविक केले, तर संदीप गिड्डे यांनी आभार  मानले.

मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांचा सत्कार

गेल्या एकादशीला मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाकडून पंढरपुरात येण्यास विरोध झाला होता. या पाश्र्वभूमीवर गेली अनेक वर्षे रखडलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनीच सोडवल्याने आज येथे सकल मराठा मोर्चाच्यावतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना राज्यकर्ता म्हणून मी कर्तव्य केले. हे यश चळवळीचे आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्याचबरोबर धनगर समाजानेही मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.