कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी सरासरी ८० टक्के मतदान झाले. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांची टक्केवारी किंचित घटल्याचे सायंकाळी पाच वाजता हाती आलेल्या आकडेवारीवरून दिसून आले. सर्वच मतदारसंघांत अत्यंत चुरशीने मतदान झाले असल्याने विजयी उमेदवारांचे मताधिक्य खूपच कमी असेल असे दिसत आहे. आघाडी व महायुती यांच्यात फुट पडल्याने पंचरंगी लढतीमुळे विजयाची खात्री छातीठोकपणे व्यक्त करताना कोणीही दिसत नाही. मतांसाठी पसे वाटण्याचे काही गंभीर प्रकार घडले असले तरी किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.
जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांत गेली महिनाभर जोरदार प्रचार सुरू होता. बुधवारी प्रत्यक्ष मतदानावेळी त्याचा प्रत्यय आला. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची वर्दळ दिसत होती. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मतदान केंद्रांवर स्त्री-पुरुष मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. हातात मतदानाचे ओळखपत्र घेऊन मतदार मतदानाच्या प्रतीक्षेत उत्साहाने उभे होते. सकाळी ७ ते ११ या पहिल्या चार तासांमध्ये सुमारे २७ टक्के मतदान झाले. त्यामध्ये कागल मतदारसंघात ३३.८३ तर शाहूवाडीत ३२.४० टक्के मतदान झाले होते. तर इचलकरंजी २२.२५ व राधानगरी २३ या मतदारसंघांची टक्केवारी कमी होती. विशेष म्हणजे या कालावधीत चंदगड मतदारसंघात पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या मताचा टक्का अधिक होता. येथे ३०.२६ टक्के स्त्रियांनी तर २८.९६ टक्के पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला होता. असेच चित्र कोल्हापूर दक्षिणमध्येही पाहायला मिळाले. येथे महिलांनी २९.२९ टक्के तर पुरुषांनी २८.४१ टक्के मतदान केले होते.
घरातील कामकाज आवरल्यानंतर महिला व पुरुष एकत्रित रीत्या दुपारी मतदान केंद्रांवर येत होते. उन्हाचा तडाखा असला, तरी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याची भावना त्यांच्यात दिसत होती. त्यामुळे भर उन्हातही मतदानाची सरासरी टक्केवारी ५८ टक्क्यांपर्यंत गेली होती. डोंगराळ भाग असलेल्या शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात ६५.५५ तर राधानगरी मतदारसंघात ६५ टक्के मतदान झाले होते. कोल्हापूर उत्तर ४६.५९ व इचलकरंजी ४८.८६ या मतदारसंघाची टक्केवारी कमी होती. या टप्प्यातही चंदगड मतदारसंघात ६२.७९ टक्के स्त्रियांनी तर ५५.३४ टक्के पुरुषांनी मतदान केले होते.  
सायंकाळच्या अखेरच्या सत्रात झालेल्या मतदानावर लक्ष्मी दर्शनाची छाप होती. गेले दोन दिवस सर्वच मतदारसंघात मतदारांना आकर्षति करण्यासाठी पशांचा मुक्त हस्ते वापर झाला होता. तरीही मतदान करतेवेळी लक्ष्मी दर्शनासाठी अडून बसलेल्या मतदारांची संख्या अधिक होती. विशेषत झोपडपट्टी भागामध्ये हे चित्र प्रकर्षांने दिसत होते. पसे वाटण्यावरून बर्याच भागामध्ये दोन गटात वादाचे प्रसंग घडले. मतदानाला तासाभराचा अवधी उरला असताना जिल्ह्यातील मतदानाचा टक्का ७० टक्क्यांची पायरी ओलांडून गेला होता. हसन मुश्रीफ विरुद्ध संजय घाटगे यांच्यातील चुरशीच्या लढतीमुळे लक्षवेधी ठरलेल्या कागल मतदारसंघात ७९.२१ टक्के मतदान झाले होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्यातील कडवी लढत असलेल्या करवीर मतदारसंघात ८१.२३ टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधी लढत म्हणून माजी गृहमंत्री सतेज पाटील व अमल महाडीक यांच्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाकडे पाहिले जाते. टोकदार लढत असतानाही या मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६५.५३ टक्के तर कोल्हापूर उत्तरमध्ये ५७ टक्के मतदान झाल्याने निकालाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.