राज्यात करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, रात्रंदिवस कायदा व सुव्यवस्थेचं काम करणाऱ्या पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ लागला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या माहिती प्रमाणे राज्यात मागील २४ तासात ८० पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर दोन पोलिसांचा संसर्ग झाल्यानं मृत्यू झाला आहे.

करोनामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये परिस्थिती चिंताजनक बनली आहे. काही शहरं रेड झोनमध्ये असून, करोना प्रसारामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या देशभरात लॉगडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे.

लॉकडाउनमुळे पोलीस रस्त्यावर असून, पोलिसांनाही करोनाचा संसर्ग होण्याच्या घटना वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५२ हजार ६६७ इतकी झाली आहे. यात आतापर्यंत १ हजार ८८९ पोलिसांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर एकूण २० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ३१ करोना बाधित पोलीस विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून, ८३८ पोलीस करोनावर मात करून पुन्हा घरी परतले आहेत.

राज्यात सोमवारी २ हजार ४३६ करोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण संख्या वाढली असून, ५२ हजार ६६७ इतकी झाली आहे. तर दिवसभरात ११८६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण १५ हजार ७८६ रुग्ण होऊन घरी परतले आहेत. सध्या ३५ हजार १७८ रुग्ण उपचार घेत आहेत.