नववर्षांच्या स्वागतापूर्वी २०१४ ला निरोप देताना ३१ डिसेंबरच्या रात्री विशेष परवाने दिले जाणार आहे. औरंगाबाद शहरातील परवान्यांची संख्या ८० हजारांहून अधिक असू शकते, असा राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अंदाज आहे. देशी मद्यासाठी २ रुपये तर विदेशी मद्यासाठी ५ रुपये परवानाशुल्क आहे. सार्वजनिकरीत्या जल्लोष साजरा करताना मद्यपरवान्यासाठी कर आकारणीत वाढ करण्यात आली आहे.
शहरातील लेमन ट्री, ताज, व्हिट्स आणि कीज् या हॉटेलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि मद्यपानास परवानगी मागण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अतिरिक्त कर लावून मंजुरी देण्याचे ठरविले आहे. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना आकारल्या जाणाऱ्या तिकिटाच्या २० टक्के रक्कम शुल्क म्हणून आकारले जाणार आहेत. शहरात कोठेही अवैध दारू विक्री होऊ नये यासाठी तीन पथके गठीत करण्यात आली आहे. विशेषत: लष्करी विभागातील मद्याची विक्री शहरात अन्यत्र तर होत नाही ना, याची तपासणी विशेषत्वाने केली जाणार आहे. हॉटेलमध्ये सार्वजनिक स्तरावर मद्यपानासाठी विशेष परवाने घ्यावे लागतात. तशी परवानगी देण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे शिवाजी वानखेडे यांनी सांगितले.
शहरातील सर्व बार पहाटे ५ पर्यंत उघडे ठेवण्यासही मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, ३१ डिसेंबरच्या रात्री अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनीही बंदोबस्त वाढविण्याचे ठरविले आहे. पहाटेपर्यंत बार उघडे राहणार असल्याने पोलीस यंत्रणेवर अधिकचा ताण असेल. मात्र, नव्या परवानगीमुळे तळीरामपंथी अनेकांना आनंद झाला आहे.