वसई : वसई -विरार महापालिकेच्या वालीव येथील वरुण  करोना उपचार केंद्रात एका ८२ वर्षीय करोनाबाधित वयोवृद्ध नागरिकाला उपचारासाठी दाखल केले होते. मात्र हा रुग्ण गेल्या काही दिवसांपासून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालिकेच्या दप्तरीसुद्धा या रुग्णाची नोंद नसल्याने अडचणी आणखीनच वाढल्या आहेत.

वसईतील वीर सावरकर नगरमधील रामचंद्र दास (८२) यांना करोना झाल्याने त्यांना २२ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.४५ सुमारास पालिकेच्या वरुण करोना केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यांच्या उपचाराचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने ५ मे रोजी त्यांचे नातेवाईक त्यांना घरी आणण्यासाठी गेले, परंतु रामचंद्र दास हे करोना केंद्रात नसल्याचे समजले.  पालिकेच्या दफ्तरीसुद्धा या रुग्णाची नोंद नसल्याचे आढळून आले आहे.

रामचंद्र दास यांचे कोणीही नसल्याने ते गेल्या अनेक वर्षांंपासून आमच्या सोबतच आहेत. त्यामुळे आता त्यांना करोना झाल्याने आम्ही पालिकेला माहिती देऊन त्यांना वरुण इंडस्ट्री येथे उपचारासाठी दाखल केले होते.  मात्र आता ते त्या ठिकाणी नाहीत मग गेले कुठे?  जरी काही त्यांच्यासोबत झाले असेल तर तशी माहितीसुद्धा आम्हाला पालिकेने द्यायला हवी होती. तशी कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे नातेवाईक गोराचंद्र मुखर्जी यांनी सांगितले.

कारण रामचंद्र दास हे वयोवृद्ध असल्याने ते स्वत: एकटय़ाने चालू फिरू शकत नाहीत, मग येथून गायब कसे होतील असेही त्यांनी सांगितले आहे. पालिकेने याबाबतची योग्य माहिती आम्हाला द्यावी, अशी मागणी मुखर्जी यांनी केली आहे.वसईतील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पाटील यांनीही या रुग्णाची अधिक चौकशी केली असता कोणतीही माहिती मिळाली नाही. यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देऊन वरुण केंद्रातून रामचंद्र दास हे रुग्ण गेले कुठे या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे. याप्रकरणी पालिकेचे उपायुक्त किशोर गवस यांनी रुग्ण गायब झाला आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल असे सांगितले आहे.