बेकायदा पद्धतीने वीज पुरविणाऱ्यांची संख्या मोठी; वीजमीटरमध्ये फेरफार

कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : वसई-विरार शहरांत मागील तीन वर्षांत वीजचोरीच्या ८२७ घटना उघडकीस आल्या आहेत.

वसई महावितरण विभागात  साडेआठ लाखांहून अधिक वीजग्राहक आहेत, परंतु अनेक भागांत वीजचोरीचे प्रकार घडत आहेत. त्यातच बेकायदा पद्धतीने वीज पुरविणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

वीजमीटरमधील फेरफार, विद्युतवाहिनींवर आकडे टाकून वीजचोरी केली जात असल्याचे प्रकार उजेडात आले आहेत.

नालासोपारा, नायगाव, चिंचोटी आणि विरार यासह इतर ठिकाणच्या भागांत मोठय़ा संख्येने बेकायदा पद्धतीने चाळी आणि इमारती उभ्या राहिल्या आहेत. अशा ठिकाणी वीजचोरीचे प्रमाण अधिक आहे.  महावितरणने अनेकदा कारवाई करूनही  वीजचोरी होण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्याचा मोठा आर्थिक फटका महावितरणााला बसला आहे.

वसई महावितरण विभागांतर्गत दर महिन्याला सरासरी १८४ मेगा युनिट्स इतकी वीज लागते. मात्र या वीजचोरीमुळे दर महिन्याला साधारपणे  १५ ते २० टक्के इतका तोटा सहन करावा लागत आहे. यातील सात टक्के तोटा हा वीजचोरीच्या रूपातील  आहे.

वीजचोरी नियंत्रणात आणण्यासाठी महावितरणची कारवाई सुरूच आहे.  २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांत ८२७ वीजचोरीच्या घटना उघडकीस आल्या. या घटनांमधील दोषींवर महावितरणने कारवाई केली आहे.  विभागवार वीजचोरी नियंत्रण पथके तयार करून येत्या काळात कारवाई केली जाणार असल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले. वीजचोरी होण्याच्या  मुख्य स्थळांवर या पथकांची नजर असल्याचे  महावितरणच्या वसई विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश चव्हाण यांनी सांगितले.

वीजगळती आटोक्यात

वसई-विरार शहरात २०१७-१८ या वर्षांत सरासरी  दरमहा वीजगळतीचे प्रमाण १६. १७ टक्के होते. २०१८-१९ या वर्षांत दरमहा १३.९२ टक्के, तसेच २०१९—२० मध्ये सरासरी १५.४० टक्के इतके असल्याचे समोर आले आहे.

आजवर वीजचोरी

वर्ष           वीजचोरांची संख्या

२०१७—१८            २२३

२०१८—१९             ११३

२०१९—२०            ४९१

एकूण                 ८२७