महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ८ हजार ३८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही संख्या गेल्या अनेक दिवसांमधली विक्रमी संख्या आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ३३ हजार १२४ अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर २६ हजार ९९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या ३३ हजारांमध्येही एक जमेची बाजू ही आहे की ८३ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं नाहीत. उर्वरीत जे १५-१६ टक्के जे रुग्ण आहेत त्यांना मध्यम प्रकारात मोडणारी लक्षणं दिसत आहेत. व्हेंटिलेटर अवघ्या दीड टक्के लोकांना लागतो आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजची संख्या मी जाणीवपूर्वक अधोरेखित जोडतो आहे. सध्याचा आपला रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ४३ टक्के इतकं आहे. तर मृत्यूदर हा ३.३ टक्के आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की साधारणपणे दीड टक्के लोक जे व्हेंटिलेटरवर जाऊ शकतात याचाच अर्थ ९७ टक्के लोक बरे होऊन घरी जात आहेत ही बाब महत्त्वाची आहे. घाबरुन जाऊ नका पण सावध रहा असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

मुंबईतही रुग्ण संख्या वाढली जरुर वाढली. पण त्यातले १६ हजार रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत. आता १९ हजार रुग्ण अॅक्टिव्ह आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. या सगळ्या मुंबईच्या परिस्थितीवर मी हे आवर्जून सांगेन की बेड्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. ऑक्सिजन असलेले बेड्सही उपलब्ध आहेत. ८० टक्के बेड्स हे मुंबई आणि राज्याच्या रुग्णालयांमधले ताब्यात घेतले आहेत. मोठ्या रुग्णालयांमधले ८०-२० तत्त्वावर १२ हजार बेड्स उपलब्ध झाले आहेत. सगळ्या परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न आपण करतो आहेत असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.