प्रबोध देशपांडे
अकोला : विश्वाव्यापी करोना आपत्तीचा अमरावती विभागातही उद्रेक झाला. आता काही प्रमाणात करोना परिस्थिती नियंत्रणात आल्याचे चित्र आहे. अमरावती विभागाच्या पाच जिल्ह्यातील संशयित रुग्णांच्या नमुन्यांचे आतापर्यंत ८४ टक्के अहवाल नकारात्मक आले आहेत. त्यामुळे रुग्णांसह आरोग्य विभागालाही सकारात्मक दिलासा मिळाला. करोनामुक्तीच्या प्रमाणात विभागात बुलढाणा व अकोला जिल्हा आघाडीवर, तर यवतमाळ जिल्ह्याचे प्रमाण सर्वात कमी आहे. अमरावती विभागात सहा महिन्यांपासून करोना संसर्ग सातत्यपूर्ण चौफेर पसरत गेला. बहुतांश शहरी भाग व्यापून घेतल्यानंतर ग्रामीण भागातही करोनाने झपाट्याने वाढत गेला.
अमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यात करोना मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला आहे. गेल्या एक-दोन आठवड्यापासून करोना परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे दिसून येते. विभागात एकूण ४३३२९ रुग्ण आढळून आले असून त्यातील ३५६०२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. १०६० करोनाबाधितांचे बळी गेले आहेत. ६६६७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ७ ऑक्टोबरपर्यंत पाचही जिल्ह्यात एकूण २९४४५७ संशयितांचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी तब्बल २४७११३ नमुन्यांचे अहवाल नकारात्मक आले. त्याची टक्केवारी ८३.९२ टक्के आहे. ४३३२९ अहवाल पॉझिटिव्ह आले असून, २५१६ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. सर्वाधिक ८३ हजारावर नमुन्यांचे संकलन अमरावती जिल्ह्यात झाले. सर्वात कमी संकलन वाशीम जिल्ह्यात झाले. विभागात सर्वाधिक रुग्ण संख्या, सर्वाधिक मृत्यू अमरावती जिल्ह्यातच झाले आहेत.
त्याखाली रुग्ण व मृत्यू संख्येत यवतमाळ जिल्ह्याचा क्रमांक लागतो. रुग्ण संख्येत तिसऱ्या स्थानावर बुलढाणा, तर अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर अकोला व वाशीम जिल्ह्याचा समावेश आहे. विभागामध्ये गत काही दिवसांमध्ये करोनामुक्तीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. विभागात ८२.१६ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. १५.३८ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर २.४४ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमरावती विभागात नियंत्रणात येत असलेली करोना परिस्थिती दिलासादायक ठरत आहे.
विभागातील करोनामुक्तीची प्रमाण जिल्हा टक्केवारी
अमरावती ८२.७०
अकोला ८५.४९
यवतमाळ ७२.४३
बुलढाणा ८७.५८
वाशीम ८४.२७
अकोल्यात रुग्णवाढीचा वेग मंदावला अकोला जिल्ह्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळून आलेल्याला आज सहा महिने पूर्ण झाले आहेत. अकोला शहरात ७ एप्रिलला करोनाने शिरकाव केला, तर १३ एप्रिल रोजी शहरात पहिला बळी गेला. अगोदर परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात असतांना मे, जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात रुग्ण व मृत्यू संख्या वेगाने वाढत गेली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुखपट्टीच्या सक्तीसारखे विशेष उपक्रम राबवून केलेल्या प्रयत्नांमुळे आता परिस्थिती आटोक्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णवाढीच्या वेग मंदावला, सोबत मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे.
करोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन सतर्क असून, उपचारासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. जनजागृतीसह मुखपट्टी वापरासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्ण संख्या कमी झाली आहे. – प्रा.संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 7, 2020 11:06 pm