विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय असतांनाच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी व शेतकऱ्यांनी कोणत्या जमिनीत कोणते पीक घ्यावे, याची माहिती देण्यासाठी अनेक ठिकाणी माती परीक्षण प्रयोगशाळा असूनही विदर्भातील ८५ टक्के शेतकऱ्यांनी अजूनही माती परीक्षण केलेले नाही.
शेतजमिनीचे आरोग्य संवर्धन करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या शेतीतील मातीचे परीक्षण करून त्याचा जो निष्कर्ष येईल त्यानुसार शेतात रासायनिक वा सेंद्रीय खतांचा वापर करणे महत्वाचे व आवश्यक आहे. विदर्भात प्रत्येक जिल्ह्य़ाच्या मुख्यालयी माती परीक्षण प्रयोगशाळा आहेत. शिवाय, प्रत्येक जिल्ह्य़ात केंद्र शासनाचे कृषी विज्ञान केंद्र आहेत. या ठिकाणीही माती परीक्षण करण्याची सोय करून देण्यात आली आहे आणि कृषी विद्यापीठाच्या मुख्यालयातही अद्ययावत माती परीक्षण प्रयोगशाळा आहे, पण इतके असतांनाही विदर्भातील ८५ टक्के शेतकऱ्यांनी माती परीक्षणच केलेले नाही, असे कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना दिसून आले. देशातील सर्वच कृषी शास्त्रज्ञ व इतरही कृषीसेवक  जमिनीच्या आरोग्य संवर्धनाबाबत बोलतात व शेतकऱ्यांना माती परीक्षण करून पीक लागवड करण्याचा सल्ला देतात, पण सध्या याबाबत काय स्थिती आहे, याचा शोध डॉ.पंजाबराव कृ षी विद्यापीठाचा विस्तार शिक्षण विभाग व त्यांच्या चमूने घेतला व आपल्या शिफारसी शासनाला सादर केल्या आहेत. त्यात हे सत्य दिसून आले.
विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांची माती परीक्षणाबाबतची स्थिती, यावर डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विस्तार शिक्षण विभागाने कुलगुरू डॉ.रविप्रकाश दाणी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनपर अभ्यास नुकताच पूर्ण  केला. हा अहवाल महाराष्ट्र शासनाला नुकताच सादर करण्यात आला आहे. संशोधनासाठी अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ व वर्धा या सहा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्य़ांची निवड करण्यात आली होती. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ातून दोन तालुके व १० गावांची ढोबळ पद्धतीने निवड करण्यात आली होती. यात एकूण १२ तालुके व ६० गावांची निवड करण्यात आली. प्रत्येक गावातून १० शेतकरी कुटुंबे याप्रमाणे ६ जिल्ह्य़ातून ६०० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांची निवड करण्यात आली त्यांच्या घरी, शेतावर जाऊन त्यांची सविस्तर माहिती घेण्यात आली व माती परीक्षणाबाबतच्या मुद्यावरही माहिती संकलित करण्यात आली. यात प्रामुख्याने ८५ टक्के शेतकऱ्यांनी अजूनही माती परीक्षण करून घेतलेले नाही. साधारणत ६९ टक्के शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे ज्ञान मध्यम स्वरूपाचे आहे. माती परीक्षण प्रयोगशाळा गाव किंवा तालुकास्तरावर नसल्याने ८७ टक्के शेतकऱ्यांना माती परीक्षण करण्यात अडचणी आल्या. ज्या शेतकऱ्यांनी ते करून घेतले आहे ते रासायनिक खतांचा पूर्णपणे वापर करीत नसल्याचेही भयानक वास्तव समोर आले आहे. ज्या शेतकऱ्यांची निवड या पाहणीसाठी करण्यात आली त्यापकी फक्त २ टक्के शेतकऱ्यांकडे शेतीपूरक व्यवसाय असल्याचे दिसून आले, तर ४६६ टक्के शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नाही. विद्यापीठाचे डॉ.डी.एम.मानकर, डॉ.एन.एम.काळे, डॉ.पी.पी.वानखडे, डॉ.पी.पी.भोपळे व डॉ.आर.एस.वाघमारे यांनी हा संशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे.