जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज, रविवारी अत्यंत चुरशीने मतदान झाले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण १० हजार २५२ मतदारांपैकी ८ हजार ९३६ जणांनी (८७.१४ टक्के) मतदान केले. मतदान शांततेत पार पाडले. सायंकाळी मतपेटय़ा मोजणी ठिकाणी आणण्यास सुरुवात करण्यात आली होती. उद्या, सोमवारी सकाळी ८ वाजता इंद्रज्योत मंगल कार्यालयात (शेंडी, नगर) मतमोजणी सुरू होईल.
सर्वाधिक मतदान नगर शहरातील मतदान केंद्रावर होते, मात्र तेथे सर्वात कमी (१ हजार ४७३-७३ टक्के) मतदान झाले. मतदान घडवून आणण्यासाठी पुरोगामी-सहकार व परिवर्तन अशा दोन्ही मंडळाचे शिक्षक नेते राष्ट्रीय पाठशाळेतील केंद्रावर ठाण मांडून बसले होते. महिला मतदारही नगरमध्ये सर्वात अधिक आहेत, मात्र त्यांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. कडक ऊन व लग्नसराई यामुळेही काही प्रमाणात कमी मतदान झाले. सर्वाधिक मतदान शेवगावमधील केंद्रावर (६८८-९७ टक्के) झाले.
तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी अशी-जामखेड १०९ (८५ टक्के), पारनेर ६५१ (८७ टक्के), श्रीगोंदे ५३५ (९२ टक्के), कर्जत ३०८ (९४ टक्के), पाथर्डी ८९७ (८९ टक्के), नेवासे ४८८ (८५ टक्के), राहुरी ७९३ (८९ टक्के), श्रीरामपूर ६१५ (९३ टक्के), राहाता १६४ (९१ टक्के), कोपरगाव ३५६ (८९ टक्के), संगमनेर १ हजार ३६ (९२ टक्के) व अकोले ८१६ (८८ टक्के).
निवडणूक रिंगणात एकूण ५२ उमेदवार होते. त्यातील ४५ सर्वसाधारण मतदारसंघात होते. त्यामुळे मतपत्रिका मोठी होती, त्यातून केवळ १६ जणांना मतदान करायचे होते, त्यामुळे मतदानास वेळ लागत होता. अनेकांनी क्रॉस व्होटिंगचा पर्याय निवडला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तालुका निबंधक खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या सकाळी मतमोजणी सुरू होईल. त्यासाठी तब्बल १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण १४ टेबल आहेत. त्यासाठी उमेदवार व त्यांच्या समवेत दोन प्रतिनिधींना प्रवेश दिला जाणार आहे. सायंकाळी ४ पर्यंत मोजणी संपेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.