यवतमाळ जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येने गुरुवारी द्विशतक पार केले. दिवसभरात नऊ करोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने एकूण रूग्णसंख्या २०७ झाली आहे. विलगीकरणत कक्षात भरती असलेला एक रुग्ण उपचारानंतर बरा झाल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली. आज नव्याने आलेल्या पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पुसद शहरातील चार, दारव्हा शहरातील चार आणि एक जण नेर येथील आहे. यात सहा पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.

अवश्य वाचा – यवतमाळ : अनावश्यकपणे बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

पुसद येथील २०, २५ आणि २७ वर्षीय पुरुष आणि ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. हे सर्वजण सोमवारी दगावलेल्या करोनाबाधिताच्या निकटच्या संपर्कातील आहेत. दारव्हा येथील २९ आणि ५४ वर्षीय पुरुष तर ३५ आणि ५५ वर्षीय महिला तसेच नेर येथील ३५ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात बुधवारपर्यंत सक्रिय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४२ होती. आज यातील एका रूग्णाला उपचारानंतर सुट्टी झाल्यामुळे ही संख्या ४१ वर आली होती. मात्र गुरूवारी नव्याने नऊ पॉझिटिव्ह वाढल्यामुळे सद्यस्थितीत सक्रिय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५० वर पोहचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २०७ वर पोहचली आहे. यापैकी १४९ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर जिल्ह्यात आठ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या २४ तासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला १७१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी नऊ पॉझिटिव्ह तर १६२ अहवाल निगेटिव्ह आहे. आज १४ नमूने प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत दोन हजार ९९२ नमूने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी दोन हजार ९६१ अहवाल प्राप्त झाले तर ३१ अहवाल अप्राप्त आहेत.