हिंगणघाट नगरपरिषदचे भाजपा ९ विद्यमान व दोन माजी नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते मुंबईत शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला.  यावेळी शिवसेना पक्ष सचिव तथा खासदार अनिल देसाई, वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी खासदार अनंत गुढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यामुळे भाजपच्या आमदार समीर कुणावार गटाला मोठा धक्का बसला आहे.

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अनंत गुढे यांची या घडामोडीत महत्वाची भूमिका राहली. भाजपाच्या अंतर्गत गटबाजीचा सुगावा लागल्यानंतर त्यांनी असंतृष्ट भाजपा नगरसेवकांशी चर्चा सुरू केली होती. ती यशस्वी होत असतांनाच कोविडच्या टाळेबंदीमुळे पक्षप्रवेशाबाबत अडसर निर्माण झाला होता. मात्र हा अडसर दूर होताच अनंत गुढे यांच्या नेतृत्वात असंतुष्ट नगरसेवकांनी आज(सोमवार) तडक मुंबई गाठली. शिवसेना विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, जिल्हा प्रमुख अनिल देवतारे व प्रकाश शहागडकर तसेच युवा सेनेचे अभिनंदन मुनोत यांच्या उपस्थितीत आठ निर्वाचित, एक स्विकृत तसेच दोन माजी नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकला.

हिंगणघाट नगरपरिषदचे उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे, नगरसेवक सतीश धोबे, सुरेश मुंजेवार,मनीष देवढे, मनोज वर्धने, भास्कर ठवरे, निलेश पोगले, नगरसेविका नीता धोबे, संगीता वाघमारे, सुनीता पचोरी, तसेच माजी नगरसेवक प्रतिभा पढोले व देवेंद्र पढोले यांनी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

नगरपरिषदेचे उपाध्यक्ष असलेले सुरेश मुंजेवार, सतिश धोबे, चंद्रकांत भूसे, मनिश देवढे, मनोज वर्धने, भास्कर ठवरे, निलेश पोगले, संगिता वाघमारे, सुनिता पचोरी, प्रतिभा पडोळे, डॉ. महेंद्र गुढे यांनी शिवबंधन बांधले.

हिंगणघाटच्या ३८ सदस्यीय नगर पालिकेत भाजपचे २८ नगरसेवक असून त्यापैकीच काहींनी आज भाजपाला सोडचिठ्ठी दिली. आमदार समीर कुणावार यासंदर्भात बोलतांना म्हणाले की, त्यांच्या पक्ष सोडण्याने काहीच फरक पडणार नाही. या नगरसेवकांचा पक्षांतराचाच इतिहास राहला आहे. पालिकेत भाजपाचेच प्रभूत्व असून विकासाची कामे थांबणार नाही.