रखरखत्या उन्हात ‘आई राजा उदो उदो, येडासरीचा उदो उदो’ या गगनभेदी जयघोषात बुधवारी येरमाळ्याच्या पावननगरीत भाविकांचा महापूर लोटला. मंगळवारपासून सुरू झालेल्या देवीच्या यात्रेचा बुधवार हा मुख्य दिवस होता. सुमारे ८ ते ९ लाख भाविकांनी येडेश्वरीच्या पालखीला खांदा देऊन चुना वेचला.
येडेश्वरी देवीच्या चत्र यात्रेमध्ये चुनखडी वेचण्याच्या कार्यक्रमाला भाविकांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. यात्रेतील हाच मुख्य दिवस समजला जातो. धार्मिक विधीनुसार सकाळी साडेआठ वाजता देवीची पूजा व महाआरती झाली. नंतर देवीचा छबिना व पालखीची मिरवणूक काढण्यात आली. पालखीचे गावात आगमन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. पुढे पालखीची मिरवणूक चुन्याच्या रानाच्या दिशेने मार्गस्थ झाली. मिरवणुकीत भाविक गळ्यात कवडय़ांच्या माळा घालून, एकमेकांना हळद लावून, हालगी, झांज व संबळाच्या तालावर तल्लीन होऊन नाचत होते. चुना वेचण्यास व देवीच्या दर्शनास महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आदी राज्यांतून भाविक मोठय़ा संख्येने येरमाळ्यात दाखल झाले होते.
पालखी चुन्याच्या रानात आल्यानंतर गर्दी अधिकच वाढली. ८ ते ९ लाख भाविकांनी चुन्याचे खडे वेचून पालखीवर वाहिले. त्यानंतर पालखीचे आमराईत प्रस्थान झाले. मंदिरात पालखी गेल्यानंतर आरती करण्यात आली. भाविकांनी दर्शनास दिवसभर गर्दी केली होती. बुधवारपासून ५ दिवस पालखीचा मुक्काम आमराईत असतो. लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तात पोलीस यंत्रणा गुंतल्याने येरमाळा येथील यात्रेत यंदा बंदोबस्तास अपुरी पोलीस यंत्रणा आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन पूर्णत: कोलमडून पडले. भाविकांनी आणलेली वाहने बाहेर काढण्यासाठी बराच वेळ लागत होता. देवीच्या दर्शनासाठी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, शिवसेनेचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील-दुधगावकर, प्रा. आबासाहेब बारकूल, यशवंत पाटील, विकास बारकूल, अनिल पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.