जिल्ह्य़ातील ८३ टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे कंपन्यांकडून घेण्याचे टाळून घरगुती बियाणे वापरले. यामुळे शेतकऱ्यांची सुमारे ९० कोटी रुपयांची बचत झाली. शेतकऱ्यांकडील सोयाबीनची किंमत प्रतिकिलो साधारण ३२ ते ३५ रुपये असते. हेच बियाणे कंपनीकडून खरेदी केल्यास त्याची किंमत ६५ ते ११० रुपयांपर्यंत जाते. गेल्या वर्षी उगवण क्षमतेची समस्या असल्याने कृषी विभागाने घरगुती बियाणे वापरण्याचा सल्ला दिला होता. परिणामी मोठी बचत झाल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे. किलोमागे सरासरी ३५ ते ५५ रुपयांची झालेली बचत ९० कोटींहून अधिक असल्याचा दावा कृषी विस्तार अधिकारी मोहन भिसे यांनी केला आहे.
जिल्हय़ात ५ लाख ५६ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे हमखास साथ देणारे पीक म्हणून शेतकरी सोयाबीनकडे पाहत असून या वर्षी सोयाबीन क्षेत्रात विक्रमी वाढ होऊन ते ३ लाख ९५ हजार हेक्टरवर पोहोचेल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. या खालोखाल नगदी पीक म्हणून तुरीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून, याचे क्षेत्रही १ लाख १० हजार हेक्टपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. उर्वरित ५० हजार हेक्टरवर ज्वारी, उडीद, मूग, तीळ अशा वाणांना शेतकऱ्यांची पसंती राहणार आहे.
गतवर्षी सोयाबीनचे वाढते क्षेत्र लक्षात घेऊन, तसेच कंपन्यांकडून बियाणे पुरवठय़ाची अनिश्चितता लक्षात घेता शेतकऱ्यांना घरगुती बियाणे पेरण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले. गतवर्षी ८३ टक्के शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्याचा वापर केला. सोयाबीनचे बियाणे नाजूक असते. एकावर एक बियाणांच्या पिशव्या ठेवल्या तरीदेखील त्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे घरगुती बियाणे वापरले तर अधिक लाभ होईल, असा प्रचार कृषी विभागाने केला होता. परिणामी ९० कोटी रुपयांची बचत झाल्याचा दावा लातूरचे कृषी विस्तार अधिकारी मोहन भिसे यांनी केला आहे. १ एकर क्षेत्रासाठी साधारण ३० किलो बियाणे लागते. ५ लाख हेक्टरावर होणाऱ्या पेरणीपैकी सोयाबीन क्षेत्र या वर्षीही वाढेल. गेल्या वर्षी खरिपात दुष्काळ असताना घरगुती बियाणांचा वापर करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना लाभदायक ठरल्याचेही भिसे सांगतात.
लातुरात मृग नक्षत्रातील चांगल्या पावसाचे आगमन झाले असले, तरी अजून पेरणीयोग्य पाऊस नाही. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी धाडस करून पेरणीस सुरुवात केली. मात्र, बाजारपेठेत बियाणे खरेदीसाठी फारशी गर्दी दिसत नाही. विविध कंपन्यांनी बाजारपेठेत मेमध्येच माल पाठवला असला, तरी मालास उठावच नसल्यामुळे बाजारपेठ थंडच आहे. गतवर्षी विविध कंपन्यांचे बियाणे उगवले नाही. या स्थितीत शेतकऱ्याला मोबदल्याऐवजी किमान बियाण्याची किंमत परत मिळण्यासाठीही खेटे घालावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांचा कंपन्यांवर चांगलाच रोष आहे.