जिल्ह्यात गेल्या १० वर्षांत ९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पकी ४५ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अर्थसाह्य़ देण्यात आले. ३६ प्रकरणे अपात्र ठरली, तर ३ प्रकरणे समितीसमोर निर्णयासाठी आहेत. चालू वर्षांत आत्महत्याग्रस्त ११ पकी ८ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली.
जिल्ह्यात गेल्या १० वर्षांत नापिकी व अतिवृष्टीमुळे शेतकरी चांगलाच आर्थिक अडचणीत आला. कधी अतिवृष्टीने पिके वाहून जाणे, तर कधी अवकाळी गारांच्या पावसाने पिकांचे नुकसान, कधी पेरलेले बियाणे उगवलेच नाही, तर कधी कापसावर लाल्याचा प्रादुर्भाव अशा विविध कारणांनी शेतकरी हैराण झाला. निसर्गाच्या कोपामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना काही बँकांनी कर्जवसुलीच्या नोटिसा दिल्या होत्या. मात्र, कर्जबाजारी असलेल्या सुमारे ९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपविले. यातील ४५ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली.
२००४ मध्ये ७, २००५ मध्ये ६, २००६ मध्ये २१, २००७ मध्ये १६, २००८ मध्ये १२, २००९ मध्ये ९, २०१० मध्ये २, २०११ मध्ये ५, २०१२ मध्ये ३ व २०१३ मध्ये ११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ९० दिवसांत मदतीचा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. काही शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी प्रस्ताव सादर करण्यास उशीर केल्याने तो नामंजूर करण्यात आला. तसेच अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीत वाहनपरवाना कागदपत्रांची केली जाणारी सक्ती मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी अडचणीची ठरू लागल्याचे चित्र आहे.
चालू वर्षी एकूण ११ कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पकी ८ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली, तर तीन प्रकरणे अपात्र ठरली. सरकारने अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी कागदपत्रांची सक्ती न करता अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.