मागील पाच वर्षांपासून अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा पाठपुरावा करणार्‍या उस्मानाबादकरांचा मार्ग यंदा सुकर होण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे स्थळ पाहणी पथक मंगळवारी उस्मानाबादेत दाखल होत आहे. संमेलन आयोजनासाठी सर्व पातळीवर करण्यात आलेल्या तयारीचा सविस्तर लेखाजोखा त्यांच्यासमोर सादर केला जाणार आहे. त्यासाठी मंगळवार, 16 जुलै रोजी उस्मानाबाद शहर आणि परिसरातील विविध संस्था, संघटनांच्या उपस्थितीत पुष्पक मंगल कार्यालय येथे जाहीर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी या सर्व तयारीकरिता बुधवारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या पदाधिकार्‍यांची बैठक होणार आहे.

मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी व संतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या वास्तव्याने पावन झालेल्या उस्मानाबादमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन व्हावे याकरिता मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थानिक शाखेने मागील पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू ठेवला होता. आगामी 93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद या चार ठिकाणाहून संमेलनाची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी नाशिक आणि उस्मानाबाद या दोन मागण्यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. त्यानुसार स्थळ पाहणीकरिता महामंडळाची समिती या दोन ठिकाणी भेट देणार आहे.

साहित्य महामंडळाचे कार्यवाह दादा गोरे यांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखा अध्यक्षांनी पत्राद्वारे स्थळ पाहणीसाठी 16 आणि 17 जुलै रोजी महामंडळाचे पथक उस्मानाबाद येथे येणार असल्याचे कळविले आहे. हे पथक संमेलन आयोजनाबाबत स्थानिक संस्थेकडून निधी संकलनासाठी करण्यात आलेली तयारी, मनुष्यबळ, संमेलनासाठी योग्य जागा, निमंत्रितांची व प्रतिनिधींची निवास व्यवस्था आदींबाबत माहिती घेवून पाहणी करणार असल्याचे या पत्रात नमुद करण्यात आले आहे. त्यानुसार मराठवाडा साहित्य परिषदेने उस्मानाबाद शहर व परिसरातील प्रमुख पाचशे संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकत्यार्ंना या बैठकीसाठी आवाहन केले आहे. शहरातील पुष्पक मंगल कार्यालय येथे बुधवार, 17 जुलै रोजी सकाळी 10 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली असून तब्बल 92 वर्षानंतर उस्मानाबादकरांसाठी निर्माण झालेली ही संधी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी सामान्य साहित्य रसिकांनीही या बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन मसापचे अध्यक्ष नितीन तावडे यांनी केले आहे.

उद्या मसापची बैठक
दरम्यान 17 जुलै रोजी होणार्‍या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी तसेच स्थळ पाहणीसाठी येणार्‍या पथकासमोर सविस्तर मांडणी करण्यासाठी आवश्यक असलेली तयारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे बुधवारी आयोजन करण्यात आले आहे. शहरातील हॉटेल रोमा पॅलेसच्या सभागृहात बुधवारी सायंकाळी 5.30 वाजता ही बैठक आयोजित केली असल्याचे तावडे यांनी सांगितले आहे.