सोलापूर जिल्हय़ात गेल्या २६ फेब्रुवारीपासून सुमारे १३ दिवस गारपीट व वादळी वा-यासह पडलेल्या पावसाने आता काढता पाय घेतल्यामुळे सर्वाना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागातील पंचनामे विनाअडथळा पूर्ण होत आहेत, तर या संकटात उद्ध्वस्त झालेल्या शेतक-याचे लक्ष शासनाच्या मदतीकडे लागले आहे. दरम्यान, जिल्हय़ात आतापर्यंत ९३ हजार ७०२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे पंचनामे झाले आहेत. शेतीसह घरे, शाळा व वीज वितरण कंपनीचे मिळून सुमारे २६२ कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाली आहे.
गारपीट, वादळी वारे व अवकाळी पावसामुळे जिल्हय़ात सर्वत्र हाहाकार माजला होता. यात आठ जणांचे बळी गेले असून मोहोळ, बार्शी, मंगळवेढा, अकलूज आदी भागांत मनुष्यहानीचे प्रकार घडले आहेत. जिल्हय़ातील एकूण ११४४ गावांपैकी तब्बल ७९८ गावांना या नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसला आहे. यात ५३८ गावे गारपिटीने ग्रस्त झाली आहेत. आठ जणांचे बळी गेले असताना ५० जण जखमी झाले आहेत. यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. मनुष्यहानीबरोबर लहानमोठय़ा जनावरांचीही हानी झाली असून आतापर्यंत ३८ मोठी तर १२१ लहान मुकी जनावरे दगावल्याची माहिती पुढे आली आहे. तर या नैसर्गिक आपत्तीमध्ये पक्ष्यांनाही हानी पोहोचली आहे. आतापर्यंत कोंबडय़ांसह १२४६ पक्ष्यांना जीव गमवावा लागला.
गारपीट व वादळी वा-यासह अवकाळी पावसाने घातलेल्या थैमानामुळे जिल्हय़ात ३७४९ घरे कोसळली असून त्यापैकी ३९४ घरे पूर्ण कोसळली आहेत. यात दोन कोटी ४० लाखांची हानी झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जाते. तर ९३ हजार ७०२ हेक्टर शेती बाधित झाली आहे. यात ८३ हजार ११७ हेक्टर शेतीपिके तर १० हजार ५८५ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे काम अद्यापि सुरूच आहे. आतापर्यंत झालेल्या नुकसानीमध्ये शेतीची सर्वाधिक २५२ कोटींची हानी झाली, तर घरांचे दोन कोटी ४० लाख व शाळांचे चार कोटी ४ लाख व वीज वितरण कंपनीचे सात कोटी ४६ लाख असे मिळून एकूण २६२ कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.