जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत येथील अगस्ती चासकर हा विद्यार्थी ९५.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. तो अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहे. ‘शिक्षणमंत्रीजी खूप खूप धन्यवाद’ ही त्याने व्यक्त केलेली भावना पुनर्परीक्षा देणा-या हजारो विद्यार्थ्यांची प्रातिनिधिक भावना म्हणायला हवी.
शिक्षण विभागाने या वर्षी जुलै महिन्यातच दहावीची पुनर्परीक्षा घेण्याचा व त्यातील उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना याच वर्षी अकरावीच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. मागील महिन्यात झालेल्या या परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला. अगस्ती चासकर हा येथील अगस्ती विद्यालयाचा हुशार विद्यार्थी मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेच्या वेळेस पहिलाच पेपर देत असताना तो आजारी पडला. त्यामुळे त्याला पुढील पेपर देता आले नाहीत. वर्ष आता वाया जाणार आपल्या मित्रांच्या तुलनेत आपण मागे पडणार ही खंत त्याला सातत्याने सतावत होती. पण राज्य सरकारने पुनर्परीक्षेचा निर्णय घेऊन त्याची याच वर्षापासून अंमलबजावणी केल्यामुळे त्याला आता अकरावीच्या वर्गात प्रवेश घेता येणे शक्य होणार आहे.
‘ही पुनर्परीक्षा माझ्यासारख्या परीक्षेची संधी हुकलेल्या मुलांसाठी सुवर्णसंधी होती. या संधीचे सोने करता आले याचा आनंद आहे. शासनाच्या निर्णयामुळे माझ्यासारख्या हजारो मुलांचे एक वर्ष वाचले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे विशेष आभार’ ही आपल्या यशानंतर त्याने व्यक्त केलेली प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. त्याला ९५.६० टक्के गुण मिळाले. समाजशास्त्रात सर्वाधिक म्हणजे ९९, तर सर्वात कमी गुण मराठीमध्ये ९१ मिळाले आहे. आपली शाळा, शिक्षक, मार्गदर्शक, आई-वडील यांचा माझ्या यशात मोलाचा वाटा असल्याचे त्याने सांगितले. आजारपण अथवा अन्य कारणांमुळे दहावीची परीक्षा देता न आलेल्या मुलांसाठी जुलै महिन्यात परीक्षा घेण्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्यामुळे मुलांचे वर्ष वाचले अशी प्रतिक्रिया शिक्षका असलेल्या त्याची आई, मीनल चासकर यांनी व्यक्त केले. आपल्या माथ्यावरचा नापासाचा शिका पुसून टाकायची अनोखी संधी शासनाने हजारो मुलांना या निमित्ताने दिले असल्याचे त्यांनी सांगितले.