नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागांसाठी रविवारी ९६.६६ टक्के मतदान झाले. २६९७ पैकी २६०७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे न्यायालयीन कोठडीतील संशयितानेही बंदोबस्तात न्यायालयाच्या परवानगीने मतदान केले. भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वातील किसान विकास पॅनल आणि काँग्रेसचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनल यांच्यात बाजार समितीवरील वर्चस्वासाठी चुरस आहे. सोसायटी गटातून ११, ग्रामपंचायत चार, तर व्यापारी गटातून दोन याप्रमाणे १७ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत सर्वाधिक रंगत ही व्यापारी गटात पाहावयास मिळत आहे. हमाल तोलारी गटातून याआधीच अशोक आरडे हे बिनविरोध निवडून आले आहेत. सकाळी आठपासून मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सोमवारी सकाळी आठपासून शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या प्रांगणात मतमोजणी सुरू होणार आहे. बाजार समितीवर सध्या भाजपची सत्ता असून ती कायम राहते की सत्तांतर करण्यात काँग्रेसला यश येते, हे मतमोजणीनंतरच कळेल.