लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यातील मृत्यूची संख्या शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. आणखी एका रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात ९८ रुग्ण दगावले आहेत. एकूण रुग्ण संख्या १९४३ झाली. जिल्ह्यातील वाढते मृत्यूचे प्रमाण धोकादायक ठरत आहे.

जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच आहे. रुग्णवाढीसोबतच करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. करोनाबाधितांचा मृत्यू रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबळीचा आकडा शंभराच्या उंबरठ्यावर दाखल झाला. जिल्ह्यातील एकूण ३१५ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २८२ अहवाल नकारात्मक, तर ३३ अहवाल सकारात्मक आले आहेत. सध्या २१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली. अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील ७६ वर्षीय पुरुष रुग्णाला १३ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. आज दिवसभरात कोविड केअर केंद्रामधून ३२, आयकॉन रुग्णालयातून दोन, शासकीय वैद्याकीय महाविद्याालय, ओझोन रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून प्रत्येकी एक, असे एकूण ३७ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील १६३० जण करोनामुक्त झाले आहेत.

आज सकाळी प्राप्त अहवालात २६ जणांचे अहवाल सकारात्मक आले. त्यात ११ पुरुष व १५ महिला आहेत. त्यामध्ये अकोट येथील सात जण, अकोली जहागीर ता.अकोट येथील पाच जण, गोरक्षण रोड येथील तीन जण, बाळापूर, मूर्तिजापूर व रजपूतपुरा येथील प्रत्येकी दोन, चांदुर, बोरगाव मंजू, मोठी उमरी, धोत्रासिंदे ता.मूर्तिजापूर आणि मुंडगाव ता.अकोट येथील रहिवासी प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आज सायंकाळी प्राप्त अहवालात सात जणांचे अहवाल सकारात्मक आले. त्यात पाच महिला व दोन पुरुष आहेत. यामध्ये रजपूतपुरा, पातूर आणि पारस येथील प्रत्येकी दोन, अकोट येथील एकाचा समावेश आहे.