धुळे-नंदुरबार विधान परिषद मतदारसंघात रविवारी ९९.२४ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे विद्यमान आमदार अमरिश पटेल आणि भाजप-शिवसेना युतीचे डॉ. शशिकांत वाणी यांच्यात सरळ लढत होत आहे.
धुळे, शिरपूर, साक्री, नंदुरबार, दोंडाईचा, नवापूर आणि तळोदा या तालुक्यांमध्ये शंभर टक्के मतदान झाले. ३९५ पैकी ३९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्य़ातील महापालिका, पालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद सदस्य असे एकूण ३९५ मतदार आहेत. सकाळी आठपासून मतदानाला सुरुवात झाली. एकूण नऊ मतदार केंद्रांवर दुपारी चापर्यंत मतदान सुरू राहिले. धुळ्यात आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान केंद्रावर जाऊन हक्क बजावला. शिंदखेडा येथे एकूण २९ मतदारांपैकी एका महिलेने वैयक्तिक कारणांमुळे मतदान केले नाही. नंदुरबार जिल्ह्य़ातील शहादा येथे ४९ पैकी ४७ जणांनी मतदान केले. भाजपने नंदुरबार जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यास उमेदवारी देत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला होता. नंदुरबार जिल्ह्य़ातील आघाडीच्या मतदारांनाही आपल्याकडे खेचण्यासाठीे ही चाल युतीने खेळली अशी चर्चा आहे. या मतदारसंघाने कायम आघाडीची साथ दिली आहे. मतदान शांततेत पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा धुळ्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.