औरंगाबादमध्ये आणखी एक महिला करोनाग्रस्त झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे राज्यातल्या करोनाग्रस्तांची संख्या ३१ वरुन ३२ वर गेली आहे. शनिवारच्या दिवशी राज्यभरात १२  करोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शनिवारी राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ३१ वर पोहचली होती. आता यामध्ये आणखी एका रुग्णाची भर पडल्याने ही संख्या ३२ वर पोहचली आहे. भारतात करोनाग्रस्तांची संख्या ९३ वर पोहचली त्यातले सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ३१ मार्च पर्यंत शाळा, कॉलेजेस, मॉल्स बंद ठेवण्याचा निर्णय करण्यात आला आहे. बस आणि रेल्वे या अत्यावश्यक सेवा असल्याने त्या सुरु असणार आहेत मात्र आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर करोनाग्रस्तांचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचंही त्यांनी शनिवारीच स्पष्ट केलं.

राज्यात शनिवारी दिवसभरात १२ रुग्ण आढळले होते. नवी मुंबई, कल्याण, पनवेल, नागपूर या ठिकाणी रुग्ण आढळले होते. पुणे आणि मुंबईत तर हे रुग्ण आहेतच. राज्याचा विचार केला तर पुणे आणि पिंपरीत १५ करोनाग्रस्त आहेत. राज्याच्या रुग्णांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. आता करोनाग्रस्तांची संख्या ही ३१ वरुन ३२ वर पोहचली आहे. राज्य शासनातर्फे खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच घाबरुन जाऊ नका काळजी घ्या असंही आवाहन करण्यात आलं आहे.