झेंडावंदनासाठी शाळेत निघालेल्या चिमुकल्याला एका भरधाव कारने चिरडल्याची घटना औरंगाबादेत घडली. अपघातात या शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. स्वांतत्र्य दिनानिमित्त उत्साहात शाळेत निघालेल्या विद्यार्थ्याबाबत ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संभाजी ज्ञानेश्वर शिंदे (वय ९) असे अपघातात मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. आज स्वांतत्र्य दिनानिमित्त तो शाळेत झेंडावंदनासाठी निघाला होता. विशेष म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा वेश त्याने परिधान केला होता. शाळेत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात तो सहभागी होणार होता.

दरम्यान, औरंगाबादमधील झाल्टा फाटा येथे एका भरधाव कारने संभाजीला चिरडले त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक तिथून पळून गेला. त्यानंतर संतप्त नागिरकांनी रस्त्यावरुन उतरुन आंदोलन केले. त्यामुळे झाल्टा फाटा ते केंब्रिज रस्त्यावरील वाहतूक रोखण्यात आली होती.