धवल कुलकर्णी 

सोलापूरमधील नरखेड या ठिकाणी उत्खनन करताना एक मृतदेह सापडला. हा मृतदेह सातवाहन काळातील असावा अशी शक्यता व्यक्त होते आहे. यावर्षी सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात असलेल्या नरखेड गावांमध्ये केलेल्या उत्खननांमध्ये अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पुरातत्वशास्त्र विभागाच्या तज्ञांना व विद्यार्थ्यांना एका माणसाचा पुरलेला सांगाडा आढळला. हे ठिकाण सातवाहन कालीन असल्यामुळे हे सातवाहन काळातील महाराष्ट्रातले पहिले असे ritual burial असू शकते. पण यावर शिक्कामोर्तब शास्त्रीय तपासणी नंतरच होईल.

साधारणपणे दोन हजार वर्षापूर्वी महाराष्ट्रात राहणारे सातवाहनकालीन लोक कुठल्या धार्मिक समजुती बाळगून होते? त्यांचे सामाजिक जीवन कसे होते? मृत्यूनंतर जीवन असतं याच्यावर त्यांचा विश्वास होता का? यापैकी किती समजुती आजच्या काळात सुरू आहेत? या आणि अशा अनेक गोष्टींचा उलगडा कदाचित येत्या काळात होऊ शकतो.

सातवाहन हे महाराष्ट्रातील ज्ञात असलेले पहिले आद्य राजे. इसवी सन पूर्व २०० ते इसवी सन २३० पर्यंत त्यांचं राज्य महाराष्ट्रातल्या एक मोठ्या भूप्रदेशावर होतं. तेव्हा तर महाराष्ट्राचा व देशातल्या इतर राज्यांचा व्यवहार हा मोठ्या प्रमाणावर रोम सारख्या देशासोबत व्हायचा.

“नरखेड हे एक सातवाहन काळातील ठिकाण आहे. तिथे आम्हाला पुरलेला सांगाडा सापडला. या सांगाड्याच्या काही जैविक अंशांवर कार्बन टेस्टिंग केल्यानंतर तो किती काळापूर्वीचा आहे हे ठरवता येईल. त्यानंतर सांगाडा सातवाहन कालीन आहे का हे कळेल. इथे सापडलेली नाणी सुद्धा सातवाहन काळातील आहेत. या माध्यमातून आम्हाला त्या काळातले लोकजीवन, सामाजिक जीवन, धार्मिक समजुती, मरणोत्तर व मृत्यूनंतरच्या जीवनाबाबत चे समज याचा उलगडा करता येईल,” असे या प्रकल्पाच्या संशोधक व विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाच्या प्रमुख माया पाटील (शहापूरकर) यांनी सांगितले.

“त्या पुरलेल्या देहासोबत काही मातीची भांडी सापडली. ही भांडी  फुटलेली होती. हे प्रेत काहीशा वेगळ्या परिस्थितीत पुरण्यात आलेले होते. एरवी पुरलेली प्रेतं ही लांब झोपलेल्या अवस्थेत असतात, किंवा त्यांचे पाय पसरलेले असतात किंवा गुडघे पोटाशी घेतलेले असतात. इथे मात्र मृत व्यक्ती ला पालथी मांडी घालून व दोन्ही हाताचे तळवे मांडीखाली ठेवून पुरण्यात आले होते,” असे पाटील यांनी नमूद केले. प्रेताच्या उजवल्या कानात एक तांब्याचे रिंग होते त्याला मातीचा मणी होता. गळ्यात धाग्याने एक दात किंवा नख अडकवण्यात आले होते.

कार्बन डेटिंगमुळे या मृत व्यक्ती चा कालमान ठरवता येईल. कालांतराने ही माणसं कोण होती कुठून आली होती याचा शोध सुद्धा डीएनए टेस्टिंग च्या माध्यमातून लावता येईल. हा सांगाडा एका घराच्या मागच्या बाजूला पुरला गेला असावा. हे सातवाहनकालीन ठिकाण हे दुष्काळ व शुष्क हवामानामुळे ओसाड पडले असावे.

सातवाहन म्हणजे महाराष्ट्रात एक बलाढ्य राजवंश. यांचा संस्थापक म्हणजे सिमुक सातवाहन. गौतमिपुत्रा सातकर्णी या अधिपत्याखाली हे राज्य अगदी शिखरावर पोहोचले. राजा हल सातवाहनाने गाथासप्तशती चे संकलन केले. सातवाहन राजा सातकर्णी पहिला (ज्ञात असलेला तिसरा सातवाहन राजा, बहुदा संस्थापक सिमुक चा मुलगा) यांची पत्नी नागनिका हिने नाणेघाट खोदला व देशातून कोकणात व शेवटी भारताबाहेर व्यापारी मार्ग झाला. सातवाहनांनंतर शत्तप, वाकाटक यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं. सातवाहन पूर्वी रत्था (Rattha) यांनी महाराष्ट्र राज्य केलं पण यांच्याबाबत फारशी माहिती आज उपलब्ध नाही. नागनिका ही नाग वंशाची होती.