करोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातल्यानंतर जगभरात साथरोग आजारावरील संशोधनाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. भारतात करोनाचे सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद महाराष्ट्रात असून या पार्श्वभूमीवर पुणे औंध येथे ६०० कोटी रुपये खर्चून सुसज्ज साथरोग रुग्णालय उभारण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. आगामी अर्थसंकल्पात या औंध साथरोग रुग्णालयाची घोषणा केली जाईल, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्रात करोनाचे आजपर्यंत २० लाख ६० हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले, तर ५१ हजाराहून अधिक रुग्णांचे मृत्यू झाले. देशातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रातील रुग्ण व मृत्यूंचे प्रमाण कितीतरी जास्त आहे. करोनाला अटकाव करताना राज्य सरकारला अनेक प्रकारे तारेवरची कसरत करावी लागली. राज्यात हिवताप, मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लूसह वेगवेगळे साथीचे आजार एकीकडे तर वाढते असंसर्गजन्य आजार दुसरीकडे असे चित्र असले तरी गेल्या दशकात साथीच्या आजारांपेक्षा मधुमेह, व उच्च रक्तदाबासह असंसर्गजन्य आजारांचे प्रमाणही वेगाने वाढत आहे. तथापि करोनामुळे सारेच गणित बदलून गेले असून, करोनासह भविष्यातील साथरोग आजारांचा विचार करून सुसज्ज रुग्णालय उभारणे याला आरोग्य विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यासाठी पुणे येथील औंध उरो रुग्णालयाची जागा निश्चित करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालय हेही संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांसाठी अधिग्रहित करण्याची योजना असल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

औंध उरो रुग्णालयात ६०० खाटांचे सुसज्ज साथरोग रुग्णालय उभारण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात २०० खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. या ठिकाणी साथरोग प्रशिक्षण, संशोधन, उपचार व संदर्भ सेवा यांची व्यवस्था असणार आहे. यासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. साथीच्या वेगवेगळ्या आजारांचा सामना करण्यासाठी डॉक्टर- परिचारिकांना प्रशिक्षण तसेच परिणामकारकपणे कामाचे नियोजन करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. भारतातील वेगवेगळ्या साथीच्या आकाराप्रमाणे जगभरातील साथीचे आजार व उपचार तसेच संशोधन कामावर या साथरोग रुग्णालयातील संशोधन केंद्रातून अभ्यास केला जाणार आहे.