वर्धामधील सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रूग्णालयात एक करोनाबाधीत रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.  हा  रूग्ण उपचारासाठी वाशिम जिल्ह्यातून शनिवारी दाखल झाला होता. त्याची तपासणी झाल्यानंतर तो करोनाग्रस्त असल्याचे रात्री स्पष्ट झाले. कोविड रूग्णालय म्हणून मान्यता असलेल्या सेवाग्रामच्या रूग्णालयात त्याला आता दाखल करण्याची तयारी सुरू आहे.

या रूग्णालयात करोना संशयीतांची तपासणी होत असते. तपासणीत या रूग्णाला सकारात्मक लक्षणे आढळून आली होती. तो सावंगीच्या रूग्णालयात उपचारार्थ दाखल झाला होता. सावंगी येथे यवतमाळ व अन्य जिल्ह्यातून विविध उपचारासाठी रूग्णांची गर्दी होत असल्याने रूग्णालय प्रशासनाने त्याबाबत आक्षेप घेतला होता. मात्र जिल्हा प्रशासनाने रूग्णांची तपासणी टाळू शकत नसल्याचे स्पष्ट केल्याने अखेर रूग्णालयाला बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या रूग्णांची तपासणी सुरूच ठेवावी लागली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांनी सदर रूग्णावर सेवाग्रामच्या रूग्णालयात उपचार करण्यात येणार असल्याचे नमूद केले.