-निखील मेस्त्री
पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील वेवजीच्या जंगलात अज्ञातांनी नौदल अधिकारी सुरजकुमार दुबे यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना काल(शनिवार) समोर आली होती. त्यानंतर आज(रविवार) या अपहरण व हत्या प्रकरणाच्या पोलीस तपासात आणखी वेगळी माहिती समोर आली असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

सुरजकुमार यांचे चेन्नई विमानतळावरून अपहरण करून, तीन अज्ञातांनी त्यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच, तीन दिवस सुरजकुमार यांना चेन्नई येथे डांबून ठेवल्यानंतर, ५ जानेवारी रोजी त्यांना तलासरी वेवजी जंगलात आणून त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळले असल्याची माहिती स्वतः सुरजकुमार यांनी मृत्यू अगोदर दिलेल्या जबावात दिली होती. मात्र असे असले तरी पालघर पोलीसांनी मागील दोन दिवसांत केलेल्या तपासात आणखी वेगळी माहिती समोर आली आहे.

प्रत्यक्षात सुरजकुमार यांचे दोन मोबाईल नंबर असले, तरी ते तिसरा क्रमांक देखील वापरत होते. ज्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना नव्हती. या तिसऱ्या क्रमांकाद्वारे सुरजकुमार हे शेअर बाजाराचे व्यवहार करीत असल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे. एक फेब्रुवारी रोजीपर्यंत हा तिसरा क्रमांक चालू होता असे त्याच्या एका नातेवाईकाने सांगितले असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

सुरजकुमार यांनी कामाच्या ठिकाणी असलेल्या आपल्या सहकाऱ्यांकडून काही पैसे हातउसने घेतले होते. तसेच त्यांच्या खात्यात काही नाममात्र रक्कम पोलिसांना आढळली. तसेच, या खात्यातून त्यांनी सर्वाधिक व्यवहार शेअर बाजाराशी संबंधित काही खासगी कंपन्यामार्फत केला असल्याचे पोलिसांनी म्हटले. याप्रकरणी घोलवड पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, ठार मारले अशा विविध कलमान्वये गुन्हे दाखल असून या प्रकरणाच्या तपासासाठी पालघर जिल्हा पोलिसांनी दहा पथके तैनात केली असून, सुमारे शंभर पोलीस अधिकारी कर्मचारी विविध पातळीवर तपास करीत आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली असली तरी सुरजकुमार यांच्या जबाबानुसार पोलीस एका वेगळ्या निष्कर्षापर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागत आहे. या प्रकरणाच्या तपासात पुढे काय निष्पन्न होते हे पाहावे लागणार आहे.

सुरजकुमार यांच्या सहकाऱ्यावर संशय –
सुरजकुमार यांचा संपर्क होत नसल्याने त्यांचे वडील मिथिलेश दुबे हे रांची येथील पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार दाखल करायला गेले होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना चेन्नई येथे तक्रार दाखल करण्यासाठी जाण्यास सांगितले. मात्र चेन्नई येथील पोलीस ठाण्यातही सूरज यांच्या नातेवाईकांची तक्रार घेतली नाही. सूरजकुमार यांचा एका सहकाऱ्यावर त्यांच्या वडिलांनी संशय व्यक्त केला आहे.