प्रशांत देशमुख

करोनाच्या भीतीमुळे खासगी दवाखाने बंद करून बसलेल्या डॉक्टरांना ते सुरू ठेवण्याचे इशारे शासनाकडून मिळत असण्याच्या पार्श्वभूमीवर दिवसरात्र दवाखाना उघडून गरजू मजुरांना सेवा देणाऱ्या डॉ. सतीश हरणे यांचे वेगळे उदाहरण चर्चेत आहे.

वर्धेतील बॅचलर रोडवर रात्री दहापर्यंत गरजूंना सेवा देणारे डॉक्टर म्हणून सतीश हरणे चर्चेत आहेच. सकाळी दहा ते दुपारी दोन तसेच सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यत डॉ. हरणे यांचा दवाखाना तसेच त्यांच्यालगत अग्रवाल यांचे औषधाचे दुकान या ही काळात सुरू आहे. प्रामुख्याने निवारागृहातील मजूर तसेच काही उद्योगात कार्यरत मजुरांसाठी डॉ. हरणे हेच धन्वंतरी ठरले आहे.

“वर्धेत सेवाग्राम व सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे रूग्णालय तसेच शासनाचे सामान्य रूग्णालय सध्या सेवा देत आहे. डॉ. सचिन पावडे, डॉ. सुहास जाजू व अन्य काही मोजकी डॉक्टरमंडळी सेवेत आहेत. मात्र, मजुरांचा ओढा डॉ. हरणे यांच्याकडेच असल्याचे पाहायला मिळते. रणरणत्या उन्हातील दिवसभरातील श्रमाअंती सहज उपलब्ध होणारे म्हणून आम्ही डॉ. हरणेकडे येतो,” असे ठेकेदार रामप्रसाद सांगातात.

या सेवेबाबत बोलतांना डॉ. हरणे म्हणाले, “ही सेवा कर्तव्याचाच भाग आहे. पैशांची बाब दुय्यम ठरावी. मजूरांना तपासणीसोबतच दोन प्रेमाचे शब्द बोलणारे आनंद देवून जातात.” करोनाच्या पार्श्वभूमीवर या गरीब घटकास वैद्यकीय उपचार देणे अत्यंत महत्वाचे ठरत आहे.