सध्या जगभरात धुमाकुळ घालणाऱ्या करोना व्हायरस दिवसेंदिवस भारतातही आपले जाळे विस्तारत आहे. या जीवघेण्या व्हायरसचा बिमोड करण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. सरकारला या कामात मदत करण्यासाठी देशभरातील अनेक दानशूरांनी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता नाशिक येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्यांने देखील आपले दातृत्व दाखवून देत, समाजासमोर नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

दत्ता राम पाटील असं नाव असलेल्या या दानशूर शेतकऱ्याने सामाजिक बांधिलकीचं भान ठेवत, आपल्या तीन एकर पैकी एक एकर जमिनीवरील काढलेला गहू गरजू व्यक्तींना वाटप करणे सुरू केले आहे.  ते पत्नीसह शेतात उभं ऱाहून गरजूंना गहू वाटप करत आहेत. शेतातील गव्हाची रास त्यांनी गावातील गोरगरीब व शेतमजूरांसाठी खुली केली आहे.

मी लहान शेतकरी आहे. आम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर नाही, मात्र आमच्याकडे एक चपाती आहे. ज्यामधील अर्धी चपाती आम्ही ज्याला याची खरच गरज आहे, त्यांना नक्कीच देऊ शकतो, असे दत्ता पाटील यांनी सांगितले आहे.

देशभरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशभरात 21 दिवसांसाठी लॉक डाऊनचा निर्णय घेतला आहे. या मुळे हातावर पोट असणाऱ्यांचा खाण्यापिण्याचा प्रश्न काही प्रमाणात निर्माण झाल्याचे दिसत आहे.  मुंबईत रविवारी करोनानं आणखी एक बळी घेतला. करोनाचा संसर्ग झालेल्या एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महिलेला करोनासदृश्य लक्षण आढळून आल्यानंतर रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. त्यानंतर करोना तपासणीत महिलेला संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान, करोनामुळे मुंबईत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.