मुलगी लग्नासाठी तयार होत नसल्याने चिडलेल्या बापाने डोक्यात बेडगं घालून स्वतःच्या मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर आरोपी बापाने चौघांना सोबत घेऊन गुपचूप अंत्यविधी केला. प्रेत अर्धवट जळाल्यामुळे ते मध्यरात्रीच दफन करून टाकल्याचा प्रकार आठ दिवसांनंतर बनपुरी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी बाप उत्तम महादेव चौगुले याच्यावर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक झाली आहे.
सांगलीच्या आटपाडी येथे उत्तम चौगुले हा बनपुरी येथे पूर्वेला चौगुले वस्तीवर कुटुंबीयांसोबत राहतो. १३ मार्चला तारखेला शनिवारी रात्री त्यांच्या घरी हा प्रकार घडला. १४ मार्चला मुलीला पाहण्यासाठी पाहुणे येणार होते. मात्र मुलगी लग्नाला नकार देत होती. आत्ताच लग्न नको असा आग्रह ती करत होती.
यावरून रात्री दोघांमध्ये मोठ वाद झाला. यातूनच रागाच्या भरात उत्तम चौगुले याने बेडग्याने मुलीला बेदम मारले. यावेळी डोक्यावर मार बसल्यामुळे मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर घरात स्वच्छता करून, शेजाऱ्यांसमोर मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव केला. वस्तीवरची अनेक माणसं अंत्यविधीसाठी जमा झाली होती. अनेकांना ही घटना संशयास्पद वाटली. त्यामुळे बहुतांश साऱ्यांनीच काढता पाय घेतला.
यानंतर आरोपी उत्तम चौगुले याने इतर चौघांना सोबत घेऊन घराशेजारीच असलेल्या ओढापात्रात शेतातील लाकडे गोळा करून मध्यरात्री अंत्यविधी केला. प्रेत अर्धवट जळल्यामुळे पहाटे ते ओढा पात्रातच दफन केले. तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जनही केले नाही. या घटनेची गावात उलट सुलट चर्चा चालू होती. अखेर आज पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन संशयित आरोपी उत्तम चौगुले याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने स्वतःच्या मुलीचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 22, 2021 10:46 am