कोल्हापूरच्या टोल संदर्भातील फेरमूल्यांकनाचा अहवाल २० मे पर्यंत प्राप्त होणार आहे. तेव्हा ३१ मे पर्यंत टोलबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. राज्यातील इतर शहरांपेक्षा कोल्हापूरला टोलच्या बाबतीत जादा काही देण्याची शासनाची भूमिका असणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी टोलविरोधी कृती समितीच्या शिष्ट मंडळाशी बोलताना दिली.
कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या मेळाव्यास मंत्री शिंदे उपस्थित राहिले होते, मेळावा संपल्यानंतर सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकत्रे यांनी मंत्री शिंदे यांची भेट घेतली. या वेळी शिंदे यांनी सरकारची बाजू मांडली.
सध्या रस्ते विकास प्रकल्पाच्या फेरमूल्यांकनाचे काम सुरू आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षाची जबाबदारी मंत्री शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या संदर्भात सध्याच्या परिस्थितीत कोणती कार्यवाही सुरू आहे, आणि त्यात असणाऱ्या अडचणी संदर्भात कृती समितीने ही भेट घेतली होती.
या वेळी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे म्हणाले, कोल्हापूरच्या टोल रद्दसाठी येथील जनतेने सुमारे साडेचार वष्रे आंदोलन केले आहे. रस्त्यावर उतरून खासगीकरणाला विरोध केला आहे. सेनाप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूक प्रचार काळात सत्तेत आल्यावर कोल्हापूरच्या टोलबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. सध्या फेरमूल्यांकन सुरू आहे. मात्र यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व महापालिकेचे अधिकारी सहकार्य करत नसल्याची तक्रार त्यांनी केली.
यावर मंत्री शिंदे यांनी टोल मुक्तीसाठी राज्य शासनाच्या वतीने सुरू असलेल्या प्रयत्नांची मांडणी केली. ते म्हणाले, मी कोल्हापूरला येत असल्याने उद्धव ठाकरे यांनी तेथे गेल्यावर कोल्हापूरचा टोल मुक्त होण्याबाबत चर्चा करून भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. त्यांच्या आदेशानुसार कोल्हापूरला न्याय देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. शिवसेना सत्तेत असली तरी स्थानिक जनतेच्या भावना आमदार राजेश क्षीरसागर यांनी सभागृहात मांडलेले आहेत. सध्या फेरमूल्यांकन सुरू आहे. २० मे पर्यंत अंतिम अहवाल प्राप्त होईल. यानंतर ३१ मे ला याचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांत टोल संदर्भात निर्णयाची प्रक्रिया सुरू आहे. कोल्हापूरबाबत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक देण्यावर आमचा भर असणार आहे, असे स्पष्ट केले.
या वेळी बाबा पार्टे, दिलीप देसाई, भगवान काटे, संभाजी जगदाळे, राजू सावंत, प्रसाद जाधव, श्रीकांत भोसले, रमेश मोरे, अशोक पोवार, वसंत मुळीक, दिलीप पवार, दीपा पाटील, बाबासाहेब देवकर, सुभाष जाधव  आदींसह कार्यकत्रे उपस्थित होते.