सातपाटी येथून मच्छिमारीसाठी खोल समुद्रात गेलेली बोट बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. ही बोट पाच खलशांसह समुद्रात बेपत्ता झाल्याने सातपाटी गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. तटरक्षक दलाकडून व स्थानिक प्रशासनाकडून या नौकेचा शोध घेणे सुरू आहे.

बेपत्ता झालेली अग्नी माता ही बोट सातपाटी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभासद असलेल्या सविता माणिक तांडेल यांची आहे. गुरूवारी सकाळी सातपाटी बंदरातून या बोटीमधून प्रविण पांडुरंग धनू, ज्ञानेश्वर माणिक तांडेल,दिलीप माणिक तांडेल, जग्गा नाथ तांडेल हे मच्छिमार बांधव नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी गेले होते.

शुक्रवारी बोट सातपाटी बंदरात परतली नसल्याने मच्छिमार बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. ही बाब समाजमाध्यमांवरून वाऱ्यासारखी पसरू लागली. मच्छिमार बांधवांनी वायरलेस यंत्रणेद्वारे बोटीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र बोटीवर वायरलेस यंत्रणा व मोबाईल नसल्याने संपर्क होत नसल्याचे संगीतले जाते.संपर्क होत नसल्याने मत्स्यव्यवसाय विभागाला बेपत्ता बोटीची माहिती देण्यात आली. मत्स्यव्यवसाय विभाग, तटरक्षक दल,पोलीस प्रशासन व मच्छिमार बांधवांकडून बोटीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू आहे