जिल्ह्यात करोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी चंद्रपूर महापालिका क्षेत्रात तसेच बल्लारपूर शहरात गुरुवार, १० सप्टेंबर ते रविवार, १३ सप्टेंबरपर्यंत जनता संचारबंदी लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत व्यापारी असोसिएशन तसेच लोकप्रतिनिधींच्या सर्वसंमतीने घेण्यात आला.

सर्व रुग्णालयं, औषधालय, कृषी केंद्र, बँका, शासकीय कार्यालय, तसेच एमआयडीसीमधील सर्व आस्थापने या काळात सुरु राहतील. दूध वितरण, पार्सल सुविधा, सर्व पेट्रोल पंप, वर्तमानपत्रांचे वितरण, भाजीची दुकाने, किराणा दुकाने देखील सुरू राहतील. मात्र, सर्व पान ठेले, चहाच्या टपऱ्या, फुटपाथवरील दुकाने बंद ठेवण्यात येतील. नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळून करोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी केले.

या बैठकीमध्ये जनता कर्फ्यू संदर्भात उपस्थित संघटनेतील जाणकारांची मते जिल्हाधिकारी यांनी जाणून घेतली. करोना संसर्गाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तपासण्या वाढविण्यात आल्यामुळे बाधित पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे रुग्णालयातील उपलब्ध बेड संख्या तसेच ऑक्सिजन पुरवठा वाढविण्यावर प्रशासनामार्फत भर देण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी सांगितले.